पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७७०
 

 भौतिक इहवादी दृष्टी, बुद्धीला आवाहन, समाजकारण, राजकारण, धर्म, अर्थ- व्यवस्था, विद्या, विज्ञान यांत परिवर्तन किंवा क्रांती घडवून आणण्याची तळमळ ही निबंधलेखनाच्या मागची प्रेरणा आहे. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, भाऊ महाजन, विष्णुशास्त्री, टिळक, आगरकर, राजवाडे, न. चिं. केळकर, सावरकर, माटे, द. के. केळकर, महर्षी शिंदे यांचे निबंध-ग्रंथ पाहता हे सहज ध्यानात येईल.
 ब्रिटिश कालातील पहिले मोठे निबंधकार म्हणजे बाळशास्त्री जांभेकर हे होत. 'या देशातील लोकांनी आपले लक्ष संसारोपयोगी विद्या कलाकौशल्याकडे द्यावे, त्याचे व्यवहारात कसे उपयोग होतात ते शिकावे. सारांश ज्या गोष्टींनी युरोपीय लोक या देशाचे लोकांपेक्षा श्रेष्ठता पावले आहेत, आणि ज्या गोष्टी नाहीत म्हणोन या देशाची दुर्दशा झाली आहे, त्या सर्व त्यानी साध्य कराव्या,' असे त्यांनी 'दर्पण' मध्ये प्रारंभीच लिहिले आहे. बाळशास्त्री यांनी आपले सर्व निबंध 'दर्पण' व 'दिग्दर्शन' या नियतकालिकांतूनच प्रसिद्ध केले आणि धर्मसुधारणा, स्त्रीपुरुषसमता, विज्ञानाचा अभ्यास युरोपीयांची विद्या हेच त्यांचे विषय होते.
 याच सुमाराचे दुसरे मोठे निबंधकार म्हणजे लोकहितवादी. 'प्रभाकर' या पत्रात त्यांनी प्रथम 'शतपत्रे' लिहिली. त्यांच्या विषयी विवेचन मागे केलेच आहे. धर्म, बुद्धिप्रामाण्य, स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, उद्योग, यंत्र, आर्थिक प्रगती, पार्लमेंट, लोकशाही हे त्यांच्या पत्रांचे विषय होते. 'शतपत्रा'नंतर त्यांनी पुष्कळ लेखन केले. पण ते सर्व निबंध-ग्रंथरूपाचेच आहे. १८७६ साली त्यांनी 'हिंदुस्थानास दरिद्र येण्याची कारणे' हे पुस्तक प्रसिद्ध केले. 'स्थानिक स्वराज्य' हा त्यांचाच छोटासा प्रबंध आहे. त्यात त्यांनी शासनसंस्थेच्या स्वरूपाचे दिग्दर्शन करून प्रजेच्या मूलभूत हक्काचे विवेचन केले आहे. 'ग्रामरचना, त्यांतील व्यवस्था व त्यांची हल्लीची स्थिती' हा १८८३ सालाचा निबंध आहे. 'वृत्तवैभव' या पत्रात त्यांनी अनेक निबंध लिहिले, ते 'निबंधसंग्रह' या नावाने पुढे ग्रंथरूपाने त्यांनी प्रसिद्ध केले. हा ११०० पृष्ठांचा ग्रंथ आहे. त्यावरून, आपल्या समाजाच्या भवितव्याची लोकहितवादी कशी अखंड चिंता करीत असत ते ध्यानी येते. इतिहास हा तर त्यांचा अत्यंत आवडता विषय. १८५१ सालीच त्यांनी 'भरतखंडपर्व' या नावाने हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास लिहून इतिहासलेखनाची परंपरा महाराष्ट्रात सुरू केली आणि त्यानंतर सुराष्ट्र, गुजराथ, राजस्थान इ. देशांच्या इतिहासाची मराठीत भाषांतरे केली. 'आमच्या देशाच्या माहितीच्या संबंधाने लोकहितवादी केवळ समुद्र आहेत,' ही त्यांच्याविषयीची उक्ती कशी सार्थ आहे ते यावरून दिसेल.
 याच काळात भाऊ महाजन, दादोबा पांडुरंग, म. फुले, रामकृष्ण विश्वनाथ असे आणखी निबंधलेखक होऊन गेले. पण एक गोष्ट स्पष्ट दिसते की निबंध-ग्रंथ ही जी श्रेष्ठ वाङ्मयरचना तिचा खरा प्रारंभ विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधमालेपासून झाला. बाळशास्त्री, लोकहितवादी व वर उल्लेखिलेले इतर लेखक यांनी फार मोठे