पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७७१
विचारप्रधान साहित्य
 

सामाजिक कार्य केले, यात शंका नाही. त्याचे वर्णन आणि महत्त्व वर अनेक ठिकाणी सांगितलेच आहे. पण आता आपण साहित्य म्हणून त्यांच्या लेखनाचा विचार करीत आहोत. त्या दृष्टीने पाहता मनातील आशय व्यक्त करणे, या पलीकडे साहित्यकळा अशी त्यांच्या लेखनाला आली नाही. ती कळा शैलीमुळे येत असते आणि तशी निबंधलेखनाची कसलीच शैली यांच्या लेखनात आढळत नाही.
 निबंध ही विचारप्रधान रचना आहे. एक विचारबीज मनात येताच त्याविषयी सर्व माहिती संकलित करणे, तिचे वर्गीकरण करणे, मग तिची व्यवस्थित रचना करणे व त्यावरून शेवटी निष्कर्ष काढणे या पद्धतीने मानवी मनात ग्रंथ तयार होतो. तसा तो तयार झाल्यावर विषयाचे महत्त्व, त्याची कारणे, त्याचे पूर्व रूप, सध्याचे रूप, रूढ समज, वास्तव स्थिती, विरोधी विचार, तुलना, आक्षेप, खंडन, मंडन, इतर पंडितांचे त्याविषयी विचार, ऐतिहासिक दृष्टीतून परीक्षण, अन्वयव्यतिरेक पद्धतीने तपासणी, उपायचिंतन इत्यादी विविध अंगांनी त्याचा- त्या बीजाचा- वटवृक्ष तयार करणे ही निबंधरचना होय. तिचे लेखन करताना उपक्रम, उपसंहार यावर कटाक्षाने लक्ष ठेवणे आणि उपहास, उपरोध, व्याजोक्ती, वक्रोक्ती, उपमा दृष्टातांदी अलंकार, इतिहासातील प्रमाणे, कार्यकारणमीमांसा, संस्कृत, मराठी, इंग्रजी अवतरणे, सुभाषिते, अनेकविध न्याय, म्हणी, पंचतंत्र, इसापनीती यांसारख्या ग्रंथांतील गोष्टी यांनी मूळ विषयाचे प्रतिपादन सजवणे या सगळ्याला शैली म्हणतात. अशा तऱ्हेची निबंधरचना मराठीत प्रथम विष्णुशास्त्री यांनी सुरू केली. म्हणूनच मराठीत त्यांच्या निबंधमालेने नवयुग सुरू केले, असे म्हणतात.
 स्वधर्म, स्वभाषा, स्वदेश, यांचा अभिमान जागृत करणे हा विष्णुशास्त्री यांचा हेतू होता. त्यांच्या आधी जे मोठेमोठे पंडित झाले त्यांची एक दृढ श्रद्धा होती की, इंग्रजच या देशाचे कल्याण करतील. परमेश्वराने त्यांचे राज्य येथे त्याच हेतूने आणले आहे. हे स्वत्वहीन परावलंबन नष्ट करणे हा विष्णुशास्त्री यांचा हेतू होता. इंग्रज हा या देशाचा शत्रू असून तो आपले रक्तशोषण करीत आहे, त्याच्या पाशातून मुक्त होऊन स्वातंत्र्यप्राप्ती करून घेणे हे आपले आद्य कर्तव्य होय, असा त्यांचा सिद्धांत होता. आणि 'मराठी भाषेची सांप्रतची स्थिती' या पहिल्या निबंधापासून, 'आमच्या देशाची स्थिती' या शेवटच्या निबंधापर्यंत त्यांनी सर्व लिखाण त्या सिद्धांताच्या प्रस्थापनेसाठीच केले. विषय कोणताही असो; इतिहास, वक्तृत्व, इंग्रजी भाषा- कोणताही विषय असो- इंग्रज मिशनरी, पंडित व इंग्रज राज्यकर्ते यांच्या अपसिद्धांतांवर, अपकृत्यांवर, झोड उठविल्यावाचून विष्णुशास्त्री तो पुरा करीतच नसत. पण याबरोबर स्वतःच्या समाजाच्या दोषांवरही ते तितकीच कडक टीका करीत असत. जुने शास्त्री पंडित, लोकभ्रमांत पिचणारा समाज, अभ्यासहीन सुशिक्षित वर्ग यांवर कडक प्रहार ते करीत असत आणि इंग्रजांच्या प्रत्येक गुणाची प्रशंसा करीत असत. येथे क्रांती घडवून आणण्यासाठी आपण इंग्रजांनाच गुरू केले पाहिजे, असे स्पष्टपणे