पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७६८
 

आहे' असेच नाव प्रा. पानतावणे यांनी आपल्या लेखमालेला दिले आहे. बंधूमाधव यांच्या लघुकथेतील लिंबा हा पाटलाला बजावतो की 'मी मेलेला बैल ओढायला येणार नाही.' त्यावर 'देवानेच तुम्हांला महाराच्या जन्माला घातले आहे', असे पाटील सांगतो. त्यावर लिंबाने उत्तर केले की 'देवाने नाय, तुमच्यासारख्या सोद्या माणसांनीच हा भेद केला आहे.' या सर्व साहित्यात युगानुयुगांच्या गुलामगिरी- विरुद्ध बंड आहे क्रांतीची भाषा आहे. हा माणुसकीचा लढा आहे. नामदेव ढसाळ यांच्या कथेतील नायक म्हणतो, 'दलित वर्गाला संघटित केले पाहिजे, त्यांना वर्ग- संघर्ष शिकविला पाहिजे.' या सर्व साहित्याचा असा क्रांतिकारक सूर आहे व त्याचे स्वागत केले पाहिजे, असे डॉ. फडके यांनी म्हटले आहे.
 किसन फागू बनसोड यांनी 'मजूरपत्रिका', 'चोखामेळा' इ. वृत्तपत्रेही काढली होती. प्रा. पानतावणे यांनी त्यांना डॉ. आंबेडकरांच्या जोडीला नेऊन बसविले आहे. डॉ. आंबेडकरांची 'बहिष्कृत भारत', 'जनता' व 'प्रबुद्ध भारत' ही वृत्तपत्रे प्रसिद्धच आहेत त्यांतील 'अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ', 'महार आणि त्यांचे वतन', 'अस्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी', 'अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया', 'हिंदूंचे धर्मशास्त्र', 'हिंदू धर्माला नोटीस' या लेखांनी क्रांतीचा पाया घातला आणि नव्या तरुण दलित लेखकांना स्फूर्ती दिली. हिंदुधर्माच्या नेत्यांनी या साहित्याची वेळीच दखल घ्यावी इतके ते मोलाचे आहे.
 ललित साहित्याचा येथवर विचार केला. आता विचारप्रधान साहित्याचा विचार करावयाचा. तो पुढील प्रकरणात करू.