पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५१
मरहट्ट सम्राट सातवाहन
 

म्हैसूरपर्यंतचा भूभाग जिंकून चंद्रगुप्ताने अखिल भारताचे एक साम्राज्य स्थापन केले ही होय. ज्ञात इतिहासात अखिल भारत एका साम्राज्यात एका सत्तेखाली या वेळी प्रथमच आला. यामुळे या घटनेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शैशुनाग वंशाने साम्राज्य स्थापन केले होते. पण ते उत्तर भारतापुरते होते. इतिहासकाळात तसे साम्राज्य प्रथमच झाल्यामुळे त्यालाही महत्त्व आहे यात शंका नाही. पण चंद्रगुप्ताचे साम्राज्य अखिल भारतव्यापी होते. त्यामुळे त्याचे महत्त्व अर्थातच असाधारण असे आहे.

अशोकाची अहिंसा
 चंद्रगुप्तानंतर त्याचा पुत्र बिंदुसार याने पित्याने स्थापिलेले अखिल भारतीय साम्राज्य जसेच्या तसे टिकवून धरले. काहींच्या मते त्याचा विस्तारही केला. त्यानंतर सम्राट अशोक सत्ताधीश झाला. त्याने शस्त्रबळाने अहिंसा, भूतदया, वैराग्य, संन्यास, शून्यवाद यांनी संपन्न अशा धर्माचा प्रसार केला. आणि चंद्रगुप्ताने निर्मिलेली अत्यंत कार्यक्षम, समर्थ व परंजयी अशी राज्ययंत्रणा ढिली करून टाकली. त्यामुळे शंभर- सव्वाशे वर्षे बंद पडलेली यावनी आक्रमणे पुन्हा सुरू झाली आणि डेमिट्रियस, मिनेंडर हे ग्रीक ( यावनी ) राजे भारतात घुसून अयोध्येपर्यंत येऊन ठाण मांडून बसले. पूर्वी प्रचंड सेना घेऊन शिकंदरासारखा महाबल सेनानी आला होता. तरी त्याला तसू तसू भूमी लढूनच घ्यावी लागली. त्यामुळे वायव्य सीमेजवळच्या एका लहानशा पट्ट्यापलीकडे त्याला काहीच जिंकता आले नाही. सीमेजवळच्या भारतीयांच्या ठायी अशी प्रखर प्रतिकारशक्ती त्या वेळी होती. पण आता अशोकाने बौद्ध अहिंसा व वैराग्य यांचा प्रसार करून राष्ट्राची प्रतिकारशक्तीच नष्ट करून टाकली होती. समाजाला हतबल करून ठेविले होते. त्यामुळे डेमिट्रियस व मिनँडर, कापसात खड्ग घुसावे तसे भारतात घुसले. मगध सम्राट बृहद्रथ हा धर्मराजाच्या शांतवृत्तीने हे वस्त्रहरण पाहात बसला होता. याच वेळी पुष्यमित्राचा उदय झाला. तो बृहद्रथाचा सेनापती. त्याने सर्व सूत्रे हाती घेतली, सम्राटाला कंठस्नान घातले आणि स्वतः सम्राटपदावर आरूढ होऊन यावनी आक्रमकांना भारताच्या सीमेबाहेर हाकलून लावले. पुष्यमित्राने रणविद्या, प्रतिकारशक्ती, क्षात्रतेज यांचेच केवळ पुनरुज्जीवन केले असे नाही, तर वैदिक संस्कृतीचेही पुनरुज्जीवन केले आणि त्याचे प्रतीक म्हणून अश्वमेध यज्ञही केला. पुष्यमित्राच्या शुंगवंशाने ११२ वर्ष ( इ. पू. १८४ -७२ ) मगधाचे राज्य केले व त्यानंतर ४५ वर्षे म्हणजे इ. पू. ३० पर्यंत काण्ववंशाने सत्ता चालविली. पण पुष्यमित्रानंतरचे राजे विशेष कर्तबगार नव्हते. त्यामुळे तेव्हापासूनच साम्राज्याला उतरती कळा लागली होती; आणि काण्वांच्या राजसत्तेला मगधाबाहेर मुळीच प्रतिष्ठा राहिलेली नव्हती. यामुळे ग्रीक आक्रमकांनी पुन्हा डोके वर काढले होते आणि आता शक- कुशाणांच्या टोळधाडीही भारतावर येऊ लागल्या होत्या. या वेळी उत्तर भारतात