पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६३
मराठी ललित साहित्य
 

'उपेक्षितांचे अंतरंग' या नावाचा त्यांचा कथासंग्रह मराठीत झाला आहे. अनेक वर्षे दलित समाजात ते काम करीत होते. त्यामुळे त्यांच्या कथांत जिवंत अनुभूतीचा आढळ पदोपदी होतो. 'माणुसकीचा गहिवर', 'शेवंतीचा खराटा', 'रामभरोशी पुन्हा धन्याच्या दारात' अशा त्यांच्या अनेक कथा मनाला चटका लावून सोडतात. महादेवशास्त्री जोशी यांची निवेदनपद्धती जुनी आहे. पण त्यांची लघुकथा पूर्ण आधुनिक आहे गोमंतक, बेळगाव या बाजूचे सर्व थरांतील जीवन त्यांनी आपल्या 'भावबळ', 'मानिनी' 'घररिघी', 'जगावेगळे सासर', धन आणि मन' इ. कथांतून रंगविले आहे. वि. वि बोकील यांच्या कथा विनोद व उपरोध यांनी अलंकृत असतात. चतुर व मार्मिक संवाद हे त्याचे वैशिष्ट्य. 'जमीन अस्मान', 'व्यवहार आहे हा', 'धंदेवाईक मंडळी' या कथा त्या दृष्टीने पाहाव्या. द. र. कवठेकर यांनी मध्यमवर्गीय जीवनातील अतिशय करुण असे प्रसंग निवडून त्यांचे भावव्याकुळ असे चित्रण केले आहे. 'तिळाच्या वड्या', 'मी लावते हं निरांजन,' 'कुंकवाचा करंडा' या कथांतून त्यांनी करुणरम्य व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. ग. ल. ठोकळ व र. वा. दिघे हे दोघेही कल्पनारम्य व अद्भुत वातावरणात रमतात.
 या काळात स्त्रीजीवनातील समस्या व स्त्रीमनाचे विश्लेषण यांच्या आधारे कथा लिहिणाऱ्या स्त्रीलेखिकांत विभावरी शिरूरकर (मालती बेडेकर) या अग्रगण्य होत. परिस्थितीने, अवहेलनेने, उपेक्षेने आणि लोकनिंदेने कोळपून गेलेल्या अनेक स्त्रियांची चित्रे त्यांनी रंगविली आहेत. 'कळ्यांचे निःश्वास' हा त्यांचा संग्रह त्या वेळी फारच गाजला होता. मुक्ताबाई दीक्षित, कमलबाई टिळक यांनीही स्त्रियांची सुखदुःखे आत्मीयतेने रंगविली आहेत.
 य. गो. जोशी, डॉ. वर्टी, शांताबाई नाशिककर, पिरोज आनंदकर, क्षमाबाई राव, मालतीबाई दांडेकर, प्रभाकर पाध्ये, अनंत काणेकर यांच्याही कथा या काळातल्या आधुनिक स्वरूपाच्या आहेत.

मनोविश्लेषण
 १९४५ च्या सुमारास लघुकथेची जुनी चाकोरी पूर्णपणे सुटत चालली. प्रारंभी कथा कथानकप्रधान होती, घटनाप्रधान होती. आता या दोन्हींना गौणत्व येऊ लागले. मनोविश्लेषणावर व सूक्ष्म वास्तववादी जीवनावर लेखक भर देऊ लागले. दुसऱ्या महायुद्धाने जुने विश्व उद्ध्वस्त झाले होते. जीवनातील चिरंतन मूल्ये कोसळून पडत होती. त्यामुळे जी अश्रद्ध वृत्ती निर्माण होऊ लागली होती. तिचे अतिवास्तव व अतिकटू चित्रण लघुकथा करू लागली. माणसाच्या अंतर्मनात खोलवर दडून बसलेल्या सुप्त- अर्धसुप्त आशा- आकांक्षांची, दबलेल्या विचारांची व विकृत भावनांची चित्रे ती रंगवू लागली. या नव्या प्रकारच्या लघुकथा- लेखकांत अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ, पु. भा. भावे, वसुंधरा पटवर्धन हे आघाडीवर आहेत.