पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७६२
 

कथा लिहिल्या. त्या पुढे स्फुट गोष्टी म्हणून प्रसिद्ध झाल्या. मात्र कादंबरीच्या क्षेत्रात त्यांना जे यश मिळाले ते लघुकथेच्या क्षेत्रात मिळाले नाही. या कथांत केवळ वृत्तकथन असे, संवाद फारसे नसत, आणि मुख्य म्हणजे नीती, सदाचार यांच्या उपदेशावर फार भर असे. १९२६ साली फडके-खांडेकरांचे युग सुरू होईपर्यंत साधारणतः सर्वच लेखकांच्या कथांचे असे रूप होते.
 या सर्वांत अग्रगण्य लेखक म्हणजे वि. सी. गुर्जर हे होत. स्वतंत्र व अनुवादित अशा शेकडो कथा त्यांनी लिहिल्या. त्यांच्या कथा प्रामुख्याने घटनाप्रधान आहेत. कोणते तरी रहस्य निर्माण करावयाचे व त्याला अचानक कलाटणी देऊन शेवट गोड करावयाचा हे त्यांचे तंत्र होते. 'घातपात', 'जगदंबा', 'दिपोटी', 'पुरुषांची जात', 'बायकांची जात', 'शेवटचे हास्य' या त्यांच्या कथा उल्लेखनीय आहेत. कृ. के. गोखले, वा. म. जोशी, काशीताई कानिटकर, गिरिजाबाई केळकर, आनंदीबाई शिर्के, सहकारी कृष्ण, ना. ह. आपटे हे त्या काळातले आणखी लेखक होत.
 यांत दिवाकर कृष्ण यांचा स्वतंत्र उल्लेख केला पाहिजे. नव्या-जुन्याच्या सांध्यावरचे हे लेखक आहेत. घटनाप्रधान लघुकथेला स्वभाव प्रधान वळण देण्याचे महत्त्वाचे कार्य यांनी केले. 'समाधी व इतर सहा गोष्टी' या त्यांच्या संग्रहावरून हे ध्यानात येईल. 'संकष्टी चतुर्थी', 'मृणालिनीचे लावण्य', 'समाधी' या त्यांच्या गोष्टी या दृष्टीने अभ्यसनीय आहेत.

फडके-खांडेकर
 १९२६ ते १९४५ हे मराठी लघुकथेचे दुसरे युग होय. ना. सी. फडके हे यातील सर्वश्रेष्ठ लेखक होत. त्यांनी नवी लघुकथा लिहिली व तिचे तंत्रही निश्चित केले. रचनासौंदर्य, भावनोत्कटता, आत्माविष्कार, निर्हेतुक कलाविकास, एकाच प्रसंगावर अथवा व्यक्तीवर केंद्रीकरण, एकच तत्त्व, हे नव्या लघुकथेचे विशेष होत. ना. सी. फडके यांनी शेकडो लघुकथा लिहिल्या आहेत. तंत्रशुद्धता, रेखीवपणा, आकर्षक सुरुवात, मध्ये गुंतागुंत, शेवटी उकल हे गुण प्रामुख्याने त्यांच्या कथांत दिसून येतात. 'उलटे शाकुंतल', 'शोभेसाठी', 'मीरा', 'ऊन आणि सावल्या' या व त्यांच्या इतर सर्व कथा या तंत्राला धरून लिहिलेल्या आहेत. वि. स. खांडेकर हे या काळचे दुसरे श्रेष्ठ लेखक. त्यांच्या कथेत अनुभवांची विविधता, समृद्धता, जिव्हाळा, या गोष्टी पुरेपूर आढळतात. सामाजिकता हा त्यांच्या कथेचा आत्मा आहे. 'आंधळ्याची भाऊबीज', 'भावाचा भाव', 'हिरा तो भंगला', 'शिष्याची शिकवण' या त्यांच्या प्रातिनिधिक कथा होत. त्यांच्या कथा लोकप्रिय झाल्या त्या तंत्रकौशल्यामुळे किंवा रचनासौंदर्यामुळे नव्हे, तर त्यांतील सामाजिक आशय व जीवनदर्शन यामुळे. वर सांगितल्याप्रमाणे 'जीवनासाठी कला' हे त्यांचे ब्रीद आहे, त्यांच्या कादंबऱ्यांप्रमाणेच त्यांच्या लघुकथाही या ब्रीदाला अनुसरून लिहिलेल्या आहेत. श्री. म. माटे यांच्या कथा म्हणजे