पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७६४
 

 अरविंद गोखले यांच्या कथेचे विश्व व्यापक आहे. महायुद्ध, बेकारी, जातीय दंगे, फाळणी, इ. अनेक घटनांची पार्श्वभूमी त्यांच्या कथांतून स्पष्ट दिसते. 'एरुशा', 'नकार', 'मीलन', 'दिव्य', 'मंजुळा', 'डाग', 'अधर्म', या त्यांच्या कथांतून गोखले यांची वैशिष्ट्ये दिसतात, त्यांतील मनोविश्लेषण प्रत्ययाला येते व समकालीन जीवनाचे दर्शन घडते. गंगाधर गाडगीळ यांनी बहुधा मध्यमवर्गीय जीवनाच्याच कथा लिहिल्या आहेत. फडके यांनी सांगितलेले लघुकथेचे तंत्र त्यांनी अगदी उधळून दिले. प्रयोगशीलता, अंतर्विरोधाची मांडणी, सूक्ष्म मनोविश्लेषण यातून दडपलेल्या भावना, मुर्दाड झालेली मने, आणि मनाच्या अनंत व्यथा त्यांनी चितारल्या आहेत. 'किडलेली माणसे', 'दुबळा', 'वारा भरलेले शीड,' 'सुखी माणसे' या कथा या दृष्टीने वाचनीय आहेत. पु. भा. भावे यांच्या 'सतरावे वर्ष', 'पहिले पाप' 'संस्कार', 'मोह', 'प्रतारणा', 'फुलवा' इ. कथांतून उद्दाम भावना, कणखर व प्रभावी भाषा, प्रणय भावनेच्या अनेक छटा यांचे चित्रण आढळते. पाश्चात्यांचे अंधानुकरण त्यांना तिरस्करणीय वाटते. त्यावर टीका करताना त्यांची लेखणी फार तिखट होते.
 'माणदेशी माणसे' हा व्यंकटेश माडगूळकर यांचा कथासंग्रह अविस्मरणीय आहे. माणदेशच्या मातीत त्यांची कथा खोल रुजलेली आहे. तेथील लोकांचे दारिद्र्य, भोळेपणा, अडाणीपणा, काहींचा अर्कटपणा यांचे परिणामकारक दर्शन त्यांनी घडविले आहे. 'ऑडिट', 'विलायती कोंबडी', 'झोंबी', 'करणी', 'भुताचा पदर' इ. कथा उल्लेखनीय आहेत. द. मा. मिरासदार यांच्या कथा खवचट विनोदाने भरलेल्या असतात. इरसाल, कावेबाज, बढाईखोर, विक्षिप्त अशी माणसे ते निवडतात आणि त्यांच्या व्यक्तिदर्शनातून विनोदाच्या बाह्य आवरणाखाली खरे जीवनदर्शन घडवितात. 'व्यंकूची शिकवणी', 'दळण', 'चोरी- एक प्रकार' इ. कथांतून त्यांचा मिस्किल विनोद विपुल आढळतो. मात्र या विनोदातील जीवनदर्शन फार प्रभावी आहे. वसुंधरा पटवर्धन यांच्या कथा व्यक्तिचित्रण व भावजीवन या दोन्ही दृष्टींनी विशेष उल्लेखनीय झाल्या आहेत. त्यांच्या कथांतून एक वेगळ्याच प्रकारची आर्तता जाणवते. कमला फडके यांनी विनोदी व खेळकर अशा बऱ्याच कथा लिहिल्या आहेत. त्यांच्या कथांत घटनांना बरेच प्राधान्य असते. पण निवेदनशैली मात्र अगदी आधुनिक व अतिशय रसाळ अशी असते. शांता शेळके यांच्या कथा हळुवार व भावनाप्रधान असतात. शंकर पाटील, ग. दि. माडगूळकर व सरोजिनी बाबर यांनी अनेक अस्सल ग्रामीण कथा लिहिल्या आहेत. ग्रामीण जीवनातील परंपरा व तेथील खानदानी यांचा सरोजिनीबाईंना अभिमान आहे. जीवनातल्या शाश्वत मूल्यांवर त्यांचा अढळ विश्वास आहे. दि. बा. मोकाशी यांच्या कथांचे क्षेत्र खूपच व्यापक आहे. विविध क्षेत्रांतली, व्यवसायांतली व थरांतली पात्रे त्यांच्या कथांत येतात व जीवनाचे बहुरंगी दर्शन घडवितात. 'काय रानटी लोक आहेत', 'आमोद सुनासी