पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६१
मराठी ललित साहित्य
 


ऐतिहासिक कादंबरी
 यानंतर ऐतिहासिक कादंबरीचा विचार करावयाचा. गुंजीकर यांनी १८७१ साली शिवशाहीवर लिहिलेली 'मोचनगड' ही मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी होय. पण सामाजिक कादंबरीप्रमाणेच ऐतिहासिक कादंबरीतही सर्वश्रेष्ठ स्थान हरिभाऊंचेच आहे. 'उषःकाल' ही त्यांची कादंबरी अगदी अतुल अशी आहे. छत्रपतींनी केलेल्या क्रांतीचे सम्यक रूप तीत आपणांस पहावयास मिळते. आकाराने लहान, पण तशीच यशस्वी अशी त्यांची दुसरी कादंबरी म्हणजे 'गड आला पण सिंह गेला' ही होय. याशिवाय सूर्योदय, सूर्यग्रहण, वज्राघात, कालकूट या ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. पण त्या तितक्या यशस्वी झाल्या नाहीत. दुसरे या क्षेत्रातले लेखक म्हणजे नाथमाधव हे होत. स्वराज्याचा श्रीगणेशा, स्वराज्याचा कारभार, स्वराज्यावरील संकट इ शिवशाहीवरील त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. ना. ह. आपटे यांची अजिंक्यतारा ही कादंबरी मराठ्यांच्या इतिहासावर असून 'रजपुतांचा भीष्म' व 'लांच्छित चंद्रमा' या दोन रजपुतांच्या इतिहासावरील आहेत हडप यांनी ऐतिहासिक कादंबरीच्या दोन माला लिहिल्या. कादंबरीमय पेशवाई व आंग्लाई या त्या माला होत. 'दुर्दैवी रंगू' ही चिं. वि. वैद्य यांची व विंध्याचल ही परांजपे यांची- या दोन कादंबऱ्या त्या वेळी खूपच गाजल्या. याशिवाय छत्रसाल, सम्राट अशोक, गुर्जरवीर अनहील, अस्तनीतील निखारा, वसईचा रणसंग्राम, दोनशे वर्षांपूर्वी, याही कादंबऱ्या त्या काळी लोकप्रिय झाल्या होत्या. या सर्वांमध्ये ऐतिहासिक काळात प्रत्यक्ष शिरून त्या काळाचे चित्रण करण्यात जी सिद्धी हरिभाऊंना मिळाली होती ती इतर कोणाला लाभलेली नव्हती. तरीही मराठे, रजपूत, गुर्जर यांचा इतिहास कादंबरीरूपाने लिहून आपल्या लोकांचा स्वाभिमान या लेखकांनी जागृत केला हे त्यांचे ऋण मोठे आहे यात शंका नाही.
 मध्यंतरी ऐतिहासिक कादंबरी जरा मागे पडली होती. अलीकडे रणजित देसाई, इनामदार यांनी तिचे उज्जीवन केले आहे यात देसाई यांच्या 'स्वामी' या कादंबरीने अपूर्व यश मिळविले. माधवराव पेशवे यांचे जीवन या कादंबरीत वर्णिले असून या थोर पुरुषाला मूर्त रूप देण्यात देसाई पूर्णपणे यशस्वी झाले आहेत.

३. लघुकथा


 लघुकथेच्या क्षेत्रातही प्रारंभ करण्याचा मान हरिभाऊंचाच आहे. त्यांच्या आधी स. का. छत्रे यांनी 'बाळमित्र' मालेतून अनेक बोधकथा लिहिल्या व इतर काहींनी बकासुराची बखर, नलराजाची बखर अशा पौराणिक गोष्टी लिहिल्या. पण भोवतालच्या सामाजिक जीवनावर कथा प्रथम लिहिल्या त्या हरिभाऊनी. १८९० साली त्यांनी 'करमणूक' हे नियतकालिक काढले व त्यात मध्यमवर्गीय कौटुंबिक जीवनावर अनेक