पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७६०
 

गांधीवादाचा अधिक्षेप त्यांच्या कादंबऱ्यात नित्य दिसून येतो. म्हणून त्यांना राजकीय कादंबरीकार म्हणतात. पण त्या वेळच्या खऱ्या क्रांतिकारकांचे दर्शन त्यांच्या कादंबरीत मुळीच घडत नाही. गांधीवादाचे तर नाहीच नाही. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या सर्वच कादंबऱ्या विचारप्रधान व समस्यापूर्ण अशा आहेत. गोंडवनातील प्रियंवदा, परागंदा, आशावादी, ब्राह्मणकन्या, विचक्षणा या त्यांच्या कादंबऱ्या होत. यातील 'ब्राह्मणकन्या' ही त्या वेळी फार गाजली. सुशिक्षित समाजाला तिने आपल्या नीतिअनीतिविषयक कल्पनांचा फेरविचार करावयास लावले, असे वा. म. जोशी यांनी म्हटले आहे. 'विधवाकुमारी' ही वरेरकरांची कादंबरी त्या वेळी अतिशय लोकप्रिय झाली होती. परतभेट, कुलदैवत इ. त्यांच्या कादंबऱ्या सहेतुक व लोक, शिक्षणात्मक आहेत.
 दत्त रघुनाथ कवठेकर यांनी साध्या कौटुंबिक गोष्टी अत्यंत सहृदयतेने सांगितल्या आहेत. त्यामुळे अपुरा डाव, रेशमाच्या गाठी, उमाडलेल्या भावना या त्यांच्या कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या आहेत. श्री. ना. पेंडसे हे प्रादेशिक कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. एल्गार, हद्दपार, गारंबीचा बापू, रथचक्र इ. त्यांच्या कादंबऱ्या वास्तवपूर्ण स्वभावरेखन, नाट्यमय प्रसंग, रम्य संवाद व प्रत्ययकारी निसर्ग चित्रण या गुणांनी संपन्न आहेत. कोकणातील जीवन हा विषय त्यांनी निवडला असून त्याचे उत्तम दर्शन या कादंबऱ्यांतून घडविले आहे. सानेगुरुजी यांच्या 'श्यामच्या आई'ने त्यांना उदंड कीर्ती मिळवून दिली. त्यामानाने, कठीण कसोटी, पराधीन, धडपडणारी मुले या कादंबऱ्या तितक्या गाजल्या नाहीत. त्यांनी आपल्या बहुतेक कादंबऱ्या तुरुंगात लिहिल्या असून देशप्रेमाने त्या ओतप्रोत भरलेल्या आहेत.

स्त्री कादंबरीकार
 गीता साने यांनी, निखळलेली हिरकणी, वठलेला वृक्ष, लतिका, माळरानात इ. कादंबऱ्यांतून स्त्रीजीवनातील समस्या चांगल्या रीतीने हाताळल्या आहेत. विभावरी शिरूरकर (सौ. मालती बेडेकर) यांच्या, हिंदोळ्यावर व विरलेले स्वप्न या कादंबऱ्यांत बाह्य घटनांपेक्षा मानसिक आंदोलनांना विशेष महत्त्व आहे. त्यांचा पवित्रा आक्रमक असल्यामुळे त्या वेळी त्यांच्या लेखनावरून मोठेच वादळ माजले होते. सौ. मालतीबाई दांडेकर यांच्या मातृमंदिर, तेजस्विनी, वज्रलेख इ. कादंबऱ्यांतून मध्यमवर्गीय कौटुंबिक जीवनातील समस्यांचे सहृदयतेने चित्रण केलेले आहे.
 ना. ह. आपटे, वि. वि. बोकील, ना. वि. कुलकर्णी, रामतनय, (ग. रा. वाळिंबे) पु. भा. भावे, दिघे, शांताबाई नाशिककर, कुमुदिनी प्रभावळकर यांनीही मराठी कादंबरी वाङ्मयात मोलाची भर घातली आहे.