पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७५८
 


कवयित्री
 आधुनिक मराठी काव्यक्षेत्रात संजीवनी मराठे, लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत व शांता शेळके या विशेष प्रसिद्ध आहेत. लक्ष्मीबाई टिळक यांनी स्त्रीगीतांचे अंतर्बाह्य स्वरूप पार बदलून टाकले. राष्ट्रीय, अध्यात्मपर, सामाजिक, अशी विविध प्रकारची कविता त्यांनी लिहिली आहे. बहिणाबाई या शेतकरी कुटुंबातील एक निरक्षर कवयित्री. पण त्यांनी आशयघन असे सुंदर काव्य निर्माण केले आहे. चूल, मूल, तवा, जाते, फुंकणी, कापणी, मळणी या विषयांतूनच त्यांनी गंभीर, तात्त्विक विचार प्रगट केले आहेत. 'संसार हे लोढणं नसून गळ्यातला हार आहे' हा त्यांचा विचार 'अरे संसार संसार' या कवितेत आहे. संजीवनी मराठे या 'काव्यकोकिळा' म्हणून गौरविल्या गेल्या आहेत. प्रेमपर, वात्सल्यपर व ईश्वरपर असे त्यांच्या कवितेचे तीन मुख्य प्रकार आहेत. सत्यशिवसुंदराची पूजा ही त्यांच्या कवितेची खरी शोभा आहे. इंदिरा संत यांच्या काव्याचा मुख्य विषय प्रेम हाच आहे. प्रेमळ व कलाभिज्ञ पतीविषयी अंतःकरणात उठणाऱ्या अनेकविध सूक्ष्म लहरी त्यांच्या काव्यात दिसून येतात. त्यांची कविता साधी व अकृत्रिम असून रंग व रंगच्छटा यांचे त्यांना विशेष आकर्षण आहे. शांता शेळके या प्रथितयश कवयित्री आहेत. सहज, सुश्लिष्ट व प्रसन्न रचना हा त्यांचा मुख्य गुण आहे. पद्मा गोळे यांचे प्रीतिपथावर, नीहार इ. कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. स्त्रीच्या अंतरातील प्रेमाच्या विविध पैलूंची विपुल चित्रे त्यांनी रेखाटली आहेत. नव्या युगातील स्त्रीच्या तेजस्वी आशा-आकांक्षाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
 १९५० पासून 'नवकाव्य' म्हणून आज जे प्रसिद्ध आहे त्याला प्रारंभ झाला. मर्ढेकर हे त्यांचे मुख्य प्रवर्तक. पण आपला हा इतिहास १९४७ पर्यंतचाच असल्यामुळे या वादग्रस्त विषयाचे येथे विवेचन केलेले नाही.

२. कादंबरी


हरिभाऊ- युग
 १८३० पासून पन्नास वर्षांतील एकंदर ललित साहित्याविषयी जे प्रारंभी लिहिले आहे ते जसे काव्यांविषयी तसेच कादंबरीविषयी खरे आहे. पाश्चात्य विद्येमुळे जी नवी दृष्टी प्राप्त झाली होती तिची प्रतीती या कादंवऱ्यांत येत नाही. बाबा पदमनजी या ख्रिश्चन गृहस्थाने १८५७ साली 'यमुनापर्यटन' ही कादंबरी लिहिली. हीच मराठीतील पहिली कादंबरी. विधवांच्या दुःखाचे तीत वर्णन आहे. पण कथानक, रचनासौंदर्य असे तीत काही नाही. पुढील मुक्तामाला, मंजुघोषा, मित्रचंद्र, विश्वासराव या कादंबऱ्या तर पुराणपद्धतीच्याच आहेत. थोडा सामाजिक विषय आणल्यासारखे लेखक मधूनच दाखवितात. पण सगळा खेळ अद्भुताचा आहे. प्रत्यक्ष सामाजिक