पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७५७
मराठी ललित साहित्य
 

ग्रामगीते यांतच गुंतून पडली होती. स्वातंत्र्य, पारतंत्र्य, क्रांती, धनिकशाहीचा जुलूम, दलिताची विपन्नावस्था, हे विषय तिने वर्ज्यच मानले होते. या कोंडीतून तिला कुसुमाग्रज, अनिल, कांत, वसंत बापट, पु. शि. रेगे यांनी मुक्त केले. यांपैकी कुसुमाग्रज हे अग्रगण्य होत. 'गर्जा क्रांतीचा जयजयकार' ही कविता आपल्याला एकदम व्यापक राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाते. हिमलाट, आगगाडी आणि जमीन, बळी, लिलाव इ. कविता पूर्णपणे समाजाभिमुख असून अन्याय, जुलूम, दलितांची दुःखे यांना वाचा फोडणाऱ्या आहेत. म्हणून खांडेकरांनी त्यांचा 'मानवतावादी कवी' असा गौरव केला आहे. कवी अनिल यांची कविता अशीच समाजाभिमुख आहे. फुलवात, भन्नमूर्ती, निर्वासित चिनी मुलास, पेर्तेव्हा हे त्यांचे काव्य होय. त्यातील फुलवात हा काव्यसंग्रह प्रेमविषयक व व्यक्तिगत कवितांचा आहे. पण 'भग्नमूर्ती' या खंडकाव्याची भूमिका व्यापक राष्ट्राभिमुख अशी आहे. समाजातील संस्कृती आधी नष्ट होते आणि मग हळूहळू त्याचा अधःपात होऊन त्याचे संरक्षणसामर्थ्यही नष्ट होते व देशाची मूर्ती भग्न होते, असा या कवितेचा आशय आहे. वा. रा. कांत हे कुसुमाग्रजा- प्रमाणेच क्रांतीचे उद्गाते आहेत. 'रुद्रवीणा' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. रुद्राने तृतीय नेत्र उघडून अन्याय, असमता यांच्यावर तांडव करून त्यांचा नाश करावा, असे ते सांगतात. नवे वर्ष, आशिया, गाशिल का हे गान, यांसारख्या कवितांतून, मानव्याची सध्या जी विटंबना चालू आहे तिच्याबद्दल त्वेष व्यक्त केला आहे. वसंत बापट हेही समाजाभिमुख कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. 'झेलमचे अश्रू' ही कविता देशाच्या विभाजनाबद्दल तीव्र त्वेष व्यक्त करते. विंदा करंदीकर यांच्या कवितेचा थाट गंभीर आणि अभिव्यक्ती मौलिक आहे. त्यांची 'स्वेदगंगा' ही वाचकाला केशवसुतांच्या तुतारीची आठवण करून देते. मंगेश पाडगावकर यांनी आपल्या कवितांतून आपली सर्व सुधारणा उथळ असून दिव्य, भव्य गोष्टींचे आपले आकर्षण कमी होत आहे, हे चांगले व्यक्त केले आहे.
 बा. भ. बोरकर हे सौंदर्याचे उपासक व त्याच्या आस्वादात रमणारे कवी आहेत. संतवाङ्मयाचे व गोमंतकीय लोकगीतांचे संस्कार त्यांच्या कवितांत दिसून येतात. गेयता, कोमलता, माधुर्य, लालित्य आणि अध्यात्म यातून त्यांच्या काव्याची मूर्त साकारली आहे. ग. दि. माडगूळकर यांचे सुगंधी वीणा, जोगिया, चैत्रबन इ. काव्यसंग्रह प्रसिद्ध असले तरी त्यांना खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती 'गीतरामायणा'ने. रामाचे ते दिव्य, अलौकिक चरित्र त्यांनी त्यातून आपल्यापुढे मूर्तिमंत उभे केले आहे. मनमोहन नातू हे लोककवी म्हणून प्रसिद्ध आहेत. 'युगायुगाचे सहप्रवासी' हे हिंदु-मुस्लिम ऐक्यावर त्यांनी लिहिलेले काव्य प्रतिपाद्य विषय व प्रतिपादन शैली या दोन्ही दृष्टींनी यशस्वी ठरले आहे.