पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७५६
 

१९०९ साली त्यांचे वडील बंधू गणेशपंत यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. तेव्हा आपल्या वहिनींना त्यांनी कविता लिहून त्यांचे 'सान्त्वन' केले. 'अमर होय ती वंशलता । निर्वंश जिचा देवाकरिता' या त्यातल्याच ओळी आहेत. 'माझे मृत्युपत्र' या कवितेतील 'की घेतले व्रत, न हे अम्ही अंधतेने' या ओळी महाराष्ट्रात प्रत्येक देशभक्ताच्या मुखी असतात. 'राष्ट्रीय काव्य' म्हणजे काय ते या कवितांवरून कळून येईल.

रविकिरण मंडळ
 १९२० च्या सुमारास केशवसुती संप्रदाय संपुष्टात आला व 'रविकिरण मंडळा'चे युग सुरू झाले. या मंडळात सात कवी होते. पण माधव जूलियन, यशवंत व गिरीश हे तीनच कवी त्यांतून गाजले. या कवींचे वळण केशवसुतीच होते. पण प्रेम, निसर्ग, जानपद, विडंबन, गूढगुंजन इ शाखांचा विस्तार यांनी विपुल केला. पण सामाजिकतेपेक्षा वैयक्तिक जीवनाकडे त्यांचे लक्ष जास्त होते.
 तुटलेले दुवे, गज्जलांजली, स्वप्नरंजन, मधुलहरी ही माधव जूलियन यांची स्फुट कविता होय आणि सुधारक, विरहतरंग, नकुलालंकार ही त्यांची दीर्घ काव्ये होत. माधवराव फारशीचे जाडे अभ्यासक होते. तेव्हा त्यांनी मराठी काव्याला बरेच फारशी वळण लावले असल्यास त्यात नवल नाही. गज्जल, रुबाया या त्यांनी मराठीत रूढ केल्या व किती तरी फारशी शब्द मराठीत रूढ केले. सुधारक, नकुलालंकार या त्यांच्या काव्यात सामाजिक रूढीवर उपहासात्मक टीका आहे, तर त्यांची प्रेमगीते निराशेने व्यापलेली आहेत.
 कवी यशवंत यांचे संशोधन, भावमंथन, यशोगंध, यशोनिधी, हे स्फुट गीतांचे संग्रह असून बन्दीशाळा, जयमंगला, शिवराय महाकाव्य ही दीर्घ काव्ये आहेत. उत्कट तळमळ, बंडखोरी, भावनोत्कटता हे त्यांच्या काव्याचे प्रधान गुण होत. देहत्वाचा पूल, तुरुंगाच्या दारात, अस्थीचा सवाल ही त्यांची राष्ट्रीय भावगीते आहेत. जीवनाविषयी त्यांची दृष्टी स्थिर असून आशा आणि निराशा या दोन्ही वृत्ती त्यांच्या काव्यातून प्रकट होतात. जानपदगीते, शिशुगिते, प्रेमगीते, निसर्गगीते इ विविध प्रकारची कविता त्यांनी लिहिलेली असून अशी गीते गाऊन दाखवून काव्यगानाची प्रथा त्यानी रूढ केली.
 गिरीश हे रविकिरण मंडळातील तिसरे प्रसिद्ध कवी. कांचनगंगा, फलभार, मानसमेघ ही त्यांची स्फुट कविता आणि अभागी कमल, आंबराई, कला ही दीर्घ काव्ये होत. यांच्या कवितेत सुधारणावाद आहे, पण क्रांतिवाद नाही. यांनी जानपदगीते, निसर्गगीते इ. विविध प्रकारचे काव्य लिहिले आहे.

समाजाभिमुख
 १९३५ च्या सुमारास मराठी कविता वैयक्तिक सुखदुःखे, प्रेमगीते, ठरीव ठशाची