पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
५०
 

स्वतंत्र राज्ये आहेत. हे सर्व प्रदेश दोनतीन शतके स्पेनच्या अधिसत्तेखाली होते. पण ती सत्ता परकी होती. त्यामुळे ती या खंडप्राय प्रदेशाला एकात्म करू शकली नाही. नंतर दीडशे वर्षापूर्वी स्पेनची सत्ता नष्ट झाली. त्या वेळी या सर्व देशांत निरनिराळ्या स्वतंत्र राजसत्ता निर्माण झाल्या. त्यामुळे या देशांच्या संस्कृती अगदी परम्परभिन्न झाल्या. उत्तर अमेरिकेवर प्रथम अशीच इंग्लंडची साम्राज्यसत्ता होती. दीड वर्षापूर्वी तीही स्पेनप्रमाणेच नष्ट झाली. पण त्यानंतर तेथील तेरा संस्थानांनी सर्वांची मिळून एक राजसत्ता निर्माण केली आणि दृढनिश्रयाने ती टिकविली. यामुळेच हा विस्तीर्ण भूप्रदेश एकात्म, एकरस झाला व त्याची स्वतंत्र संस्कृती जोपासली गेली. राजसत्तेचा महिमा असा आहे.

सातवाहन घराणे
 महाराष्ट्राच्या भाग्याने त्याच्या संस्कृतीच्या प्रारंभकाळीच त्याला अशी राजसत्ता लाभली. ती सत्ता म्हणजे विख्यात सातवाहन या राजघराण्याची होय. इ. स. पूर्व ३०० च्या सुमारास महाराष्ट्री भाषेमुळे महाराष्ट्रममाजाचा जन्म झाला; आणि सुदैवाने त्याच वेळी या भूमीत एक अत्यंत प्रभावी, बलशाली व समर्थ अशी राजसत्ता अवतरली. सातवाहनांची सत्ता येथे प्रस्थापित झाली, एवढेच नव्हे, तर या थोर राजघराण्याने साडेचारशे वर्षे आपली सत्ता अविच्छिन्न, अव्याहत, अखंड चालवून महाराष्ट्राची पृथगात्मता, अस्मिता व संस्कृती यांना पक्व, प्रौढ व दृढ असे रूप प्राप्त करून दिले.

सातवाहनपूर्व
 भारतामध्ये येथील लहान लहान राज्ये वितळवून त्यांतून एक मोठे बलशाली साम्राज्य निर्माण करण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न झाला तो मगधामध्ये. इ. स. पूर्व सहाव्या शतकात ५५० च्या सुमारास शैशुनाग वंशाने मगधात राज्य स्थापून हळूहळू अखिल उत्तर भारत, हिंदुकुशपासून आसामपर्यंतचा सर्व आर्यावर्त आपल्या साम्राज्याखाली आणला. बिंबिसार हा शैशुनाग घराण्यातील पहिला साम्राज्यकर्ता पुरुष होय. तेथून पुढे सुमारे दीडशे वर्षांनी या घराण्याची सत्ता संपुष्टात येऊन राजसत्ता नंद घराण्याकडे गेली; नंतर सुमारे शंभर वर्षांनी नंद घराण्याचा उच्छेद करून चंद्रगुप्त मौर्य याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. भारताच्या दृष्टीने मौर्य साम्राज्याचे महत्त्व विशेष आहे. पहिली गोष्ट म्हणजे चंद्रगुप्ताने ग्रीकांच्या - यवनांच्या - आक्रमणाचे निर्दाळण केले ही होय. शिकंदराने भारतावर स्वारी करून वायव्य सरहद्दीजवळच्या पट्ट्यात यवनसत्ता प्रस्थापित केली होती. चंद्रगुप्ताने ती तर नष्ट केलीच, पण त्यानंतर सेल्युकस हा ग्रीक सेनापती प्रचंड सेना घेऊन पुन्हा स्वारी करून आला तेव्हा त्याच्याशी सीमेवरच मुकाबला करून चंद्रगुप्ताने त्याचा निःपात केला व यावनी सत्तेचा कणाच मोडून टाकला. यानंतर दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे विंध्याच्या दक्षिणेचा