पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४९
विद्या आणि संशोधन
 

आणि शेवटी त्यांचे इंग्रजी भाषांतरही केले. वर उल्लेखिलेल्या सर्व कागदपत्रांचे व बखरींचे आधार त्यांनी घेतले आहेत. पण त्यांनीच एका प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे हा पसारा एवढा अवाढव्य आहे की त्यातून भिन्न भिन्न प्रसंगांचे सुसंगत चित्र उभे करणे हे काम अत्यंत अवघड व जिकिरीचे आहे. पण जन्मभर त्या एकाच विषयाला वाहून घेऊन ते कार्य त्यांनी उत्तम रीतीने पार पाडले. यासाठी महाराष्ट्र त्यांचा कायमचा ऋणी राहील.
 मराठी इतिहास संशोधनाची स्थिती अशी प्रगतिपथावर असली तरी ग. ह. खरे यांच्या मते ती अत्यंत असमाधानकारक आहे. फारशी, आरबी, डच, पोर्तुगीज इ. भाषांतील कागदपत्रांचा वापर करून कोणाही महाराष्ट्रीयाने अजून मराठ्यांचा इतिहास लिहिलेला नाही. शिवाय महाराष्ट्राचा सामाजिक, धार्मिक, आर्थिक असा इतिहास अजून लिहिला गेलेला नाही. या दृष्टीने 'महाराष्ट्रजीवन' (२ खंड, संपादक - गं. बा. सरदार, प्रकाशक- जोशी लोखंडे) या ग्रंथाचा उल्लेख केला पाहिजे. या ग्रंथात महाराष्ट्रीय संस्कृतीच्या सर्व अंगांचा प्रारंभकाळापासून १९६० पर्यंतचा इतिहास अनेक विद्वानांनी दिला आहे. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असाच आहे. पण संस्कृतीच्या प्रत्येक अंगाविषयी असे ग्रंथ झाले पाहिजेत. तरच महाराष्ट्राचे सर्व चित्र डोळ्यासमोर उभे राहील.
 महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास स्वतंत्रपणे लिहिला गेला नाही, असे वर म्हटले आहे. त्या क्षेत्रात काही प्रयत्न झाले आहेत, त्यांचा निर्देश केला पाहिजे. इंग्रज अधिकाऱ्यांनी 'कास्ट्स अँड ट्राइब्ज' यांची जवळ जवळ प्रत्येक प्रांतातील माहिती देणारे ग्रंथ लिहून ठेवले आहेत. मराठीत श्री. आत्रे यानी लिहिलेले 'गावगाडा' हे पुस्तक या दृष्टीने महत्त्वाचे आहे. यात महाराष्ट्रीय ग्रामसंस्थेचे संपूर्ण चित्रण आलेले आहे. श्री ना गो. चापेकर याचे 'आमचा गाव' हे पुस्तक समाजशास्त्रीय दृष्टीने असेच महत्त्वाचे आहे. पण या क्षेत्रातले सर्वात मोठे कार्य म्हणजे डॉ. गो. स. घुर्ये यांचे. त्यांची बहुतेक पुस्तके अखिल भारतीय समाजशास्त्रीय प्रश्नांबद्दल आहेत. पण बहुतेकांत महाराष्ट्राबद्दल पुष्कळ माहिती आहे. जातिसंस्था, कुटुंबसंस्था, वैवाहिक जीवन, यांचे सखोल विवेचन त्यांच्या ग्रंथांत असते. शिवाय ठाकूर, कातकरी, वारली, कोळी इ. आदिवासी जमातींबद्दलही त्यांनी मौलिक संशोधन केले आहे. पण हा सर्व एकाकी प्रयत्न आहे.
 यावरून आणि आतापर्यंत एकंदर संशोधनाचा जो इतिहास वर दिला आहे त्यावरून महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रांतले संशोधन अगदी तुटपुंजे आहे, असे महाराष्ट्रीय पंडितांचे मत आहे, असे दिसते. मो. वा. चिपळूणकर यांनी सृष्टिविज्ञान या विषयातील सशोधनाविषयी हेच म्हटले आहे. भारतीय विद्याभवनाने अखिल भारताचा वेदकाळापासून आतापर्यंतचा इतिहास दहाबारा खंडात लिहिण्याचे कार्य जवळ जवळ पुरे करीत आणले आहे. तसा इतिहास लिहिण्याचा महाराष्ट्रात प्रयत्नसुद्धा झालेला