पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७४८
 

देशपांडे हे होत. यवतमाळला त्यांनी 'शारदाश्रम' हा संशोधनकार्यासाठीच स्थापिला. प्रारंभी राजवाडे, वि. ल. भावे यांनी महानुभावांच्या काही गुप्त लिपींचा उलगडा केला. तेच कार्य देशपांडे यांनी पुढे चालवून, 'महानुभावीय मराठी वाङ्मय' ही पुस्तिका प्रसिद्ध केली. अनेक महंतांकडून पुस्तके मिळवून त्यांचे बालबोध लिपीत रूपांतर केले. देशपांडे यांनी इतिहासक्षेत्रातही दुर्मिळ कागदपत्रे जमविण्याचा उद्योग सतत चालू ठेवला होता. १९३८ साली स्विट्झरलंड येथील प्राच्यविद्या परिषदेत त्यांनी शोधनिबंध वाचले होते. डॉ. वि. भि. कोलते, वा. ना. देशपांडे, नेने, भवाळकर यांनी त्यांचीच परंपरा पुढे चालविली आहे. डॉ. कोलते यांनी 'महानुभावांचे तत्त्वज्ञान', 'चक्रचरचरित्र' इ. अनेक संशोधनपर ग्रंथ लिहून मराठी साहित्याची बहुमोल सेवा केली आहे.
 फारशी कागदपत्रांचा सखोल अभ्यास करणारे महाराष्ट्रातले इतिहास संशोधक म्हणजे सेतुमाधवराव पगडी हे होत. 'इतिहासाचा मागोवा', 'निजाम पेशवे पत्रव्यवहार' इ. पुस्तके लिहून त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचे विवेचन केले आहे. अलीकडे इंग्रजीत त्यांनी शिवचरित्रही लिहिले आहे.
 मराठी व इंग्रजी साहित्याच्या, कागदपत्रांच्या व बखरींच्या आधारे मराठीत विपुल इतिहास लेखन झालेले आहे. शिवाजी, संभाजी, बाजीराव, नानासाहेब, माधवराव, नाना फडणीस, महादजी शिंदे यांची चरित्रे तर झालीच आहेत. पण याशिवाय जिवबा दादा चरित्र, बायजाबाई चरित्र, अहिल्याबाई चरित्र, कोल्हापूरचा इतिहास, इचलकरंजीचा इतिहास, श्रीरंगपट्टणची मोहीम, असे वाङ्मयही प्रसिद्ध झाले आहे.
 मुंबई, पुणे, धुळे, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये मराठी इतिहासाच्या संशोधनासाठी मंडळे स्थापन झाली आहेत. आणि तेथे संशोधनाचे कार्यही चालू आहे. या क्षेत्रात आतापर्यंत काशीनाथ नारायण साने, बाळाजी प्रभाकर मोडक, द.व. पारसनीस ग. वि. वाड, आ. भा. फाळके, डॉ. पु. म. जोशी, तात्यासाहेब केळकर, गोव्याचे ना. श्री. पिसुर्लेकर, द. वि. आपटे, प्रा. ओतुरकर, पांडोबा पटवर्धन, पांडोबा चांदोरकर इ. संशोधकांनी बहुमोल कार्य केले आहे. कागदपत्रांचे संशोधन आणि त्यांची चिकित्सा करून त्याअन्वये इतिहासविषयक लेखन असे दुहेरी कार्य यांनी केलेले आहे.

सरदेसाई
 पण या बाबतीतले सर्वश्रेष्ठ इतिहास पंडित म्हणजे गो. स. सरदेसाई हे होत. इ. स. १००० पासून महाराष्ट्राच्या इतिहासाला प्रारंभ करून इ. १८५७ पर्यंतचा इतिहास त्यांनी 'मराठी रियासत' या नावाने प्रसिद्ध केला. हे जे त्यांनी कार्य केले त्याला तोड नाही. मराठ्यांचा पहिल्यापासून शेवटपर्यंत सुसंगत असा इतिहास त्यांच्या या रियासतीवाचून दिसलाच नसता. 'मुसलमानी रियासत', 'मराठी रियासत- पूर्वार्ध, मध्यविभाग, उत्तरविभाग', 'ब्रिटिश रियासत पूर्वार्ध, उत्तरार्ध' असे त्यांच्या लेखनाचे विभाग असून हे सर्व खंड त्यांनी नवनवीन कागदपत्रे मिळताच पुन्हा लिहून काढले