पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४७
विद्या आणि संशोधन
 

हा बहुमोल ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यानंतर 'छत्रपती संभाजी महाराज', 'मालोजीराजे आणि शहाजी महाराज' व 'छत्रपती शिवाजी महाराज' अशी तीन मोठी चरित्रे त्यांनी लिहिली. 'भारतीय इतिहास आणि संस्कृती', या त्रैमासिकाचे त्यांनी काही वर्षे संपादन केले. आणि त्याच काळात महाराष्ट्रेतिहासाच्या साधनसंग्रहाचे तीन भाग संपादित केले. याशिवाय 'गोवळकोंड्यांची कुतुबशाही', 'महाराष्ट्रातील गडकोट दुर्ग', 'राणा जयसिंग व शिवाजी महाराज' असे त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. संत तुकाराम महाराज यांच्यावर त्यांनी लहानमोठे अनेक संशोधनपर ग्रंथ लिहिले आहेत.
 ग. ह. खरे हे असेच नामांकित इतिहाससंशोधक आहेत. १९३० सालापासून ते भा.इ.सं.मंडळात काम करीत आहेत. निवृत्त झाले तरी अजूनही ते तेथे काम करीत आहेत. या काळात त्यांनी हजारो कागदपत्रे व दप्तरे जमा केली आहेत. इतिहास मंडळात जी एकंदर कागदपत्रे आहेत त्यांतील निम्मी तरी खरे यांनी संग्रहीत केलेली आहेत. याशिवाय सुमारे २०००० पोथ्या, ५०० नाणी, १८० चित्रे, ३० ताम्रशिला- शासने व सुमारे २०० ऐतिहांसिक वस्तू त्यांनी मंडळास मिळवून दिल्या आहेत.
 खरे यांचा फारशी भाषेचा व्यासंग दांडगा आहे. याशिवाय आरबी, कानडी, प्राकृत याही भाषांचा अभ्यास त्यांनी केला आहे. खरे यांचा मराठी व इंग्रजी लेखनसंभार मोठा आहे. ऐतिहासिक फार्सी साहित्याचे त्यांनी सहा खंड प्रसिद्ध केले आहेत. शिवचरित्र साहित्याचे असेच दहाबारा खंड त्यांनी प्रसिद्ध केले आहेत. 'मूर्तिविज्ञान', 'महाराष्ट्राची चार दैवते', 'संशोधकांचा मित्र' हे त्यांचे ग्रंथ अतिशय नावाजलेले आहेत. पुरातत्त्व व कला, अर्वाचीन इतिहास, मुद्राशास्त्र, मध्ययुगीन इतिहास, शिल्प शास्त्र इ. विषयांवर त्यांनी मराठी व इंग्रजी सुमारे ५६ पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या मराठी व इंग्रजी शोधनिबंधांची संख्या सुमारे ३६० भरेल. या कार्यामुळे त्यांचा निरनिराळ्या परिषदांत बहुमान झालेला आहे. जयपूरच्या अखिल भारतीय परिषदेत ते विभागीय अध्यक्ष होते. पुणे विद्यापीठाने पीएच. डी. चे मार्गदर्शक म्हणून त्यांस मान्यता दिलेली आहे.

मराठी साहित्य
 मराठी इतिहासाप्रमाणेच मराठी साहित्याच्या क्षेत्रातही पंडित संशोधन करीत आहेत. ल. रा. पांगारकर यांनी हा उद्योग मोठ्या कसोशीने केला आहे. ज्ञानेश्वर, मुक्तेश्वर, मोरोपंत यांचे चरित्र व वाङ्मय यांचे संशोधन करून त्यांनी त्यांची चरित्रे लिहिली आहेत. मराठी प्राचीन वाङ्मयाचा इतिहासही त्यांनी लिहिला आहे. धुळे येथे शंकर श्रीकृष्ण देव यांनी समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचे संशोधन करण्यासाठी एक स्वतंत्र संस्थाच 'समर्थ वाग्देवता मंदिर' या नावाने स्थापन केली. इतिहास संशोधनासाठी 'राजवाडे संशोधन मंडळ' त्यांनी व भास्कर वामन भट यांनी स्थापन केले. महानुभाव वाङ्ममयाचेही असेच संशोधन चालू आहे. या संशोधकांत अग्रगण्य म्हणजे डॉ. य. खु.