पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७४४
 

पां.दा. गुणे यांचा 'इंट्रोडक्शन टू फायलालजी' हा ग्रंथ भाषाशास्त्राच्या मुळाशी असलेल्या तत्त्वांच्या अभ्यासाच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. वि. का. राजवाडे जसे इतिहास संशोधक तसेच शाषाशास्त्र संशोधकही होते. त्यांचे संस्कृत भाषेचा उलगडा, नामादिशब्द व्युत्पत्तिकोश मराठी धातुकोश इ. ग्रंथ प्रसिद्ध आहेत. डेक्कन कॉलेजातील डॉ. कत्रे, डॉ. कालेलकर यांनीही भाषाशास्त्रात महत्त्वाचे संशोधन केले आहे.

डॉ. सांकलिया
 शिलालेख, ताम्रपट, नाणी, लेणी यांच्या जोडीला पुराण वस्तूंचे उत्खनन या मार्गाने सध्या डेक्कन कॉलेजतर्फे पुराणवस्तु संशोधन चालू आहे. सुमारे ५० वर्षापूर्वी मोहंजोदारो व हराप्पा येथील उत्खननात सनपूर्व २५०० वर्षापूर्वीचे अवशेष सापडले व एका प्राचीन संस्कृतीचा शोध लागला. महाराष्ट्रात डेक्कन कॉलेजतर्फे डॉ. ह. धी. सांकलिया यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, नाशिक, नेवासे येथे बरेच संशोधन झाले असून भांडी, हत्यारे, घरांचे भाग इ. अवशेषांवरून इतिहासपूर्वकालीन संस्कृतीची कल्पना येऊ शकते.

प्राचीन इतिहास
 या सर्व संशोधनाच्या आधारे भारताचा प्राचीन इतिहास लिहिणं आता सुलभ झाले आहे भारतीय विद्याभवनातर्फे 'ए हिस्टरी अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल' हा दशखंडात्मक इतिहास प्रसिद्ध झाला आहे. त्यात डॉ. पुसाळकर व प्रा. आपटे यांनी बरीच प्रकरणे लिहिली आहेत. या क्षेत्रात स्वतंत्रपणे कार्य करणाऱ्या पंडितां मध्ये डॉ. अ. स. आळतेकर हे अग्रगण्य आहेत. त्यांची 'स्टेट अँड गर्व्हन्मेंट इन् एन्शंट इंडिया', 'एज्युकेशन इन् एन्शंट इंडिया', 'पोझिशन ऑफ विमेन इन् हिंदू सिव्हिलिझेशन', 'हिस्टरी ऑफ व्हिलेज कम्युनिटिज इन् वेस्टर्न इंडिया' इ. ग्रंथ फार नामांकित आहेत. मार्क्सवादी दृष्टिकोनातून भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास श्री. श्री. अ. डांगे व प्रा. दा. ध. कोसंबी यांनी केला आहे. डांगे यांचा 'फ्रॉम प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी' व प्रा. कोसंबी यांचा 'ॲन इंट्रोडक्शन टू दी स्टडी ऑफ इंडियन हिस्टरी' हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

ग्रॅण्ट डफ
 भारताच्या प्राचीन इतिहासाच्या संशोधनाविषयी हे झाले. आता अर्वाचीन इतिहाससंशोधनाचा विचार करावयाचा. मागे अनेक वेळा सांगितलेच आहे की स्थलकालनिश्चय, कालाचे पौर्वापर्य, कार्यकारणसंबंध, सत्याची चिकित्सा, साधारसप्रमाण लिहिणे ही जी इतिहासाची रचना तिची कल्पनासुद्धा ब्रिटिश कालापर्यंत कोणाला भारतात नव्हती. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे हे खरे आहे. पण ती तशी आहे हेही