पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४५
विद्या आणि संशोधन
 

खरे आहे. इतिहासाची ही रचना प्रथम येथे ग्रॅण्ट डफ याने केली. आज त्याच्या इतिहासाला आपण कितीही नावे ठेवली तरी मराठ्यांच्या इतिहासाच्या लेखनाचा पाया त्यानेच घातला याबद्दल कोणाला वाद घालता येणार नाही.

मराठा इतिहास
 पाश्चात्य विद्यांचा येथे प्रसार झाल्यावर आपल्याकडे इतिहाससंशोधनास सुरुवात झाली आणि काही काळाने मराठ्यांच्या इतिहासाकडे पंडितांचे लक्ष जाऊ लागले. या क्षेत्रात प्रारंभीचे मोठे कार्य केले ते न्या. मू माधवराव रानडे यांनी. 'मराठ्यांच्या सत्तेचा उदय' हा अनमोल ग्रंथ तर त्यांनी लिहिलाच. पण कागदपत्रे जमा करून साधारसप्रमाण इतिहास लिहिण्याचा प्रारंभ महाराष्ट्रात त्यांनी केला याला विशेष महत्त्व आहे. पेशव्यांची दप्तरे पाहावयास मिळावी, असा त्यांचा प्रयत्न १८८३-८४ सालापासून चालू होता. पुढे दहा वर्षांनी त्यांच्या प्रयत्नाने रा. ब. वाड यांना तशी परवानगी मिळाली व त्यांनी त्या दप्तरांतून बऱ्याच कागदपत्रांची निवड केली, त्यांचा अभ्यास करण्यात माधवरावांनी बराच वेळ खर्ची घातला. याशिवाय, 'शिवाजी ॲज ए सिव्हिल रूलर', ' मराठ्यांच्या इतिहासातील अलिखित प्रकरणे', मराठ्यांच्या अमदानीतल्या टाकसाळी व नाणी', 'पेशव्यांच्या रोजनिश्यांची प्रस्तावना', 'एक हजार वर्षापूर्वीचे हिंदुस्थान', 'शंभर वर्षांपूर्वीचे दक्षिण हिंदुस्थान', 'वसिष्ठ व विश्वामित्र' इ. अनेक निबंध त्यांनी लिहिले व ते निरनिराळ्या परिषदांपुढे वाचले. 'मराठ्यांची सत्ता', म्हणजे एखादा वणवा पेटावा व थोड्या वेळाने विझून जावा, अशा तऱ्हेची होती, तिला आगापिछा काही नव्हता, असे ग्रँट डफ याने मत मांडलेले आहे. 'मराठी सत्तेचा उदय' या आपल्या ग्रंथात माधवरावांनी हे विधान सप्रमाण खोडून काढून 'महाराष्ट्रधर्माची प्रस्थापना' हे मराठ्यांच्या सत्तेचे उद्दिष्ट होते, हा सिद्धान्त मांडला. मराठ्यांच्या इतिहासाच्या विवेचनास येथूनच खरा प्रारंभ झाला. अशा रीतीने कागदपत्रे जमा करणे व त्यावरून इतिहास लिहून सिद्धान्त प्रस्थापित करणे या कार्याची माधवरावांनी पायाभरणीच महाराष्ट्रात केली असे दिसून येईल.
 विष्णुशास्त्री यांचा इतिहास हा अत्यंत आवडता विषय होता हे सर्वश्रुतच आहे. स्वदेशाचा पूर्वइतिहास अत्यंत उज्ज्वल होता हे त्यांना दाखवून द्यावयाचे होते. त्या दृष्टीनेच त्यांनी साने, मोडक व शाळिग्राम यांच्या साह्याने 'काव्येतिहास संग्रह' हे मासिक काढले होते. त्यात अनेक जुनी काव्ये, बखरी व इतर कागद छापीत असत. राजवाडे, पारसनीस यांना त्यांच्यापासूनच स्फूर्ती मिळाली, असे म. म. पोतदार यांनी म्हटले आहे.

राजवाडे
 यानंतरचा व सर्वात महत्त्वाचा उद्योग म्हणजे पुरातत्त्वभूषण वि. का. राजवाडे