पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४१
विद्या आणि संशोधन
 

तुलनात्मक असे संशोधनपर लेखन महाराष्ट्रात बरेच झाले आहे. या सर्व संशोधकांत पंडित श्री. दा. सातवळेकर हे अग्रगण्य आहेत. त्यांनी चारही वेदांच्या स्वस्त, पण उत्तम आवृत्त्या प्रसिद्ध केल्या आहेत. पाठसंशोधन, अर्थनिर्णय, भाष्य या बाबतीत त्यांचे कार्य अद्वितीय असे आहे. डॉ. श्री. व्यं. केतकर यांचे कार्य निराळ्या दृष्टीने पण असेच महत्त्वाचे आहे. ज्ञानकोशाच्या प्रस्तावनाखंडातील दोन खंड वेदवाङ्मयाच्या संशोधनालाच वाहिलेले आहेत. त्यांनी वेदांतून दिसणारा इतिहास, त्यातील आर्य- अनार्य वाद, वैदिक शब्दसृष्टी इ. निरनिराळ्या दृष्टींनी अनेक पंडितांच्या साह्याने फार मोठा अभ्यास केला आहे. 'वैदिक संशोधन मंडळा' चे श्री. सोनटक्के व श्री. काशीकर यांनी समग्र ऋग्वेदाची उत्कृष्ट संशोधित आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. पदपाठ, भाग्य, सूची यांसहित संपादित केलेल्या अशा आवृत्तीची मोठी गरज होतीच. श्री. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी ऋग्वेदाची भाषांतरासह आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. पण त्यापेक्षा त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे वेदवाङ्मयाच्या आधारे त्यांनी प्रसिद्ध केलेला चरित्रकोश हे होय. त्याच्या मागला अभ्यास निस्तुळ असाच आहे. डॉ. रा. ना. दांडेकर यांचे 'वैदिक देवतांचे अभिनव दर्शन' हे पुस्तक आणि अन्यत्र प्रसिद्ध झालेले त्यांचे लेख यांतून त्यांनी वरुण, इंद्र, विष्णू इ. वेदांतील देवतांचा, दैवतेतिहासशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र इ. शास्त्रांच्या दृष्टीने तुलनात्मक अभ्यास केला आहे.

उपनिषदे
 उपनिषदांच्या अभ्यासात डॉ. बेलवलकर व प्रा. रा. द. रानडे यांच्या 'दि क्रिएटिव्ह पीरियड,' व रानडे यांच्या 'कन्स्ट्रक्टिव्ह सर्वे ऑफ दि उपनिषदाज्' या दोन ग्रंथांचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. रानडे यांनी उपनिषदांतील विचारांचे शास्त्रीय दृष्टीने पृथक्करण करून त्यांतील विश्वोत्पत्ती, मानसशास्त्र, प्रमाणशास्त्र, नीतिशास्त्र, मरणोत्तर गती इ. विषयांची सुसूत्र मांडणी केली आहे. अशा तऱ्हेचा उपनिषदांचा अभ्यास त्यांच्या पूर्वी व नंतरही कोणी केलेला नाही. उपनिषदांच्या क्षेत्रात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध झालेला 'उपनिषत्कांड' हा चतुष्खंडात्मक ग्रंथ फार मोलाचा आहे. पहिल्या खंडात उपनिषदांची पार्श्वभूमी विशद केली आहे. दुसऱ्यात सर्व प्रमुख भाष्यकारांची भाष्ये दिली आहेत. ग्रंथाला लक्ष्मणशास्त्री यांनी फार उत्तम अशी विवेचनात्मक प्रस्तावना जोडली आहे. लक्ष्मणशास्त्री यांनी 'वैदिक संस्कृतीचा विकास' या आपल्या ग्रंथात वेदकालापासून आजपर्यंतच्या वैचारिक विकासाचे दर्शन घडविले आहे. 'अठरा मुख्य उपनिषदे' हा आचार्य वि. प्र. लिमये व प्रा. रं. द. वाडेकर यांचा ग्रंथ विशेष महत्त्वाचा आहे. त्यात वेदवेदांगांमधील बौद्ध, जैन ग्रंथांतील उपनिषत्सदृशवचने दिलेली आहेत व उपनिषदांतील शब्दांची व वाक्यखंडांची सूची दिलेली आहे.