पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७४०
 

पाश्चात्य विद्वानांतही मोठी कीर्ती मिळाली. म. मो. कुंटे यांचा 'हिंदुस्थानातील आर्य संस्कृतीची स्थित्यंतरे' हा ग्रंथ असाच गाजलेला आहे. महाराष्ट्रीय विद्वानांच्या या संशोधनामुळे मरगळ आलेल्या येथील जनतेमध्ये पूर्वसंस्कृतीचा अभिमान जागृत झाला व त्यांच्यांतील न्यूनगंड कमी होऊ लागला. शं. पां. पंडित, प्रो. काथवटे, राजारामशास्त्री भागवत यांनी याच काळात ऋग्वेद, अथर्ववेद, उपनिषदे यांची भाषांतरे प्रसिद्ध केली. पण अस्मितेला खरा उजळा मिळाला तो लो. टिळकांच्या ग्रंथांनी. 'ओरायन' या ग्रंथात त्यांनी ऋग्वेदाचा काळ इ. पू. ४५०० असा ठरवला. याच सुमारास याकोबी या जर्मन पंडिताने असाच सिद्धान्त मांडल्यामुळे टिळकांच्या सिद्धान्ताला फार मोठा दुजोरा मिळाला. 'आर्क्टिक होम इन् दि वेदाज' हा टिळकांचा दुसरा ग्रंथ. आर्याची मूळ वस्ती उत्तर ध्रुवापाशी होती, असे त्यातील मतप्रतिपादन आहे. 'गीतारहस्य' हा त्यांचा तिसरा ग्रंथ. पाश्चात्य- पौर्वात्य देशात नीतिशास्त्राचे विवेचन करणारा इतका थोर ग्रंथ दुसरा नाही, हे त्यात सिद्ध केलेले आहे. भारतीयांच्या मनात या ग्रंथाने फारच मोठी क्रांती घडवून आणलेली आहे.

डॉ. भांडारकर
 प्राच्यविद्या संशोधनातले अग्रगण्य पंडित डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे होत. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या 'इंडियन ॲंटिक्वरी' या नियतकालिकातून त्यांनी मौलिक लेखन केले आहे. 'अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन', 'शैव व वैष्णव पंथ' हे त्यांचे ग्रंथ आजही प्रमाणभूत मानले जातात. 'विल्सन फायलालॉजिकल लेक्चरस्' या मालेत त्यांनी भाषाशास्त्रावर दिलेली व्याख्याने हा भारतीय भाषाशास्त्राचा पायाभूत ग्रंथ मानला जातो. त्यांचे नाव या क्षेत्रात इतके मोठे आहे की १९१७ साली प्रा. रा. द. रानडे, डॉ. गुणे, डॉ. बेलवलकर, प्रा वै. का. राजवाडे यांनी कार्यासाठी जी संस्था स्थापिली तिचे नाव 'भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर' असेच ठेवले. या संस्थेने 'ॲनल्स्' हे वार्षिक त्याच साली सुरू केले. आज चाळीस वर्षे हे वार्षिक उत्तम कार्य करीत आहे. याशिवाय आजपर्यंत संस्थेने १२५ ग्रंथ प्रसिद्ध केलेले आहेत. पण या संस्थेचे खरे मोठे कार्य म्हणजे तिने काढलेली 'महाभारताची चिकित्सक संशोधित आवृत्ती' हे होय. डॉ. वि. स. सुकथनकर यांनी या महाकार्याचा पाया घालून महाभारताची सहा पर्वे प्रसिद्ध केली त्यानंतर ते कार्य डॉ. बेलवलकर यानी पूर्ण केले. महाभारताचे असे संशोधन यापूर्वी कोठेच झाले नव्हते. त्यामुळे या आवृत्तीची जगभर कीर्ती झाली.

वैदिक संशोधन
 वेद, वेदांगे, उपनिषदे, सूत्रे या क्षेत्रात गेल्या अर्धशतकात पाठसंशोधन, दैवतेतिहास, मानवेतिहासशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र इत्यादी दृष्टींनी चिकित्सक व