पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७३९
विद्या आणि संशोधन
 

साली चार्लस विल्किन्स या इंग्रज पंडितांनी स्वतः संस्कृत शिकून भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले. १७८९ साली कलकत्त्याचे न्यायाधीश विल्यम जोन्स यांनी शाकुंतलाचे भाषांतर केले. ते ग्रंथ वाचून पाश्चात्य युरोपीय विस्मित झाले व भारताची प्राचीन संस्कृती फार मोठी आहे, हे ध्यानात घेऊन त्यांनी प्राच्यविद्येच्या अभ्यासाला शास्त्रशुद्ध रीतीने प्रारंभ केला. श्लेगेल हे बंधू (जर्मन), चेझी, बॉप (फ्रेंच), कोलब्रुक, रॉय, मॅक्समुल्लर, ऱ्हीस डेव्हीस ही नावे या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत.

रॉयल एशियाटिक सोसायटी
 १७८४ साली विल्यम जोन्स यांनी प्राच्यविद्येच्या अभ्यासासाठी रॉयल एशियाटिक सोसायटी स्थापन केली. मुंबईला १८०४ साली स्थापन झालेली बाँबे लिटररी सोसायटी ही तिची शाखा होती. 'या खंडप्राय देशाचा इतिहास, येथील समाजसंस्था, लोकजीवन यांचा विद्वानांनी अभ्यास करावा, या देशातील भूमीला व येथील पाषाणांना बोलके करून त्यांनी पाहिलेली भूतकालीन सांस्कृतिक व वैचारिक आंदोलने त्यांना प्रगट करायला लावावीत', असा सोसायटीचा उद्देश होता. या संस्थांच्या द्वारे आणि युरोपात स्वतंत्रपणे, युरोपीय विद्वानांनी सायणभाष्यासह ऋग्वेदाची आवृत्ती, संस्कृतचा शब्दकोश, संस्कृत वाङ्मयाचा इतिहास, बौद्ध वाङ्मयाचा इतिहास इ. ग्रंथ प्रसिद्ध केले आणि मग त्यापासून हळूहळू भारतीय व महाराष्ट्रीय विद्वानांना स्फूर्ती होऊन ते या अभ्यासाकडे वळले.

भाऊ दाजी
 प्राच्यविद्या या क्षेत्रातले पहिले संशोधक म्हणजे बाळशास्त्री जांभेकर हे होता शिलालेखांचा अभ्यास करून त्यांनी रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकांतून अनेक लेख लिहिले. दुसरे मोठे पंडित म्हणजे भाऊ दाजी लाड हे होत. शिलालेख ताम्रपट, हस्तलिखिते इ. साधने देशभर हिंडून त्यांनी गोळा केली; प्रत्यक्ष लेण्यांमध्ये जाऊन तेथील शिलालेखांचे वाचन करून त्यांच्या नकला केल्या आणि त्यांचे विवेचन करणारे अनेक लेख लिहिले. त्यांचा गौरव करताना डॉक्टर भांडारकरांनी म्हटले आहे की 'त्यांच्या लेखांचा आधार घेतल्यावाचून प्राच्यविद्या संशोधकाला पुढे पाऊलच टाकता येणार नाही.'

अस्मिता
 न्या. मू तेलंग यांचे नाव या क्षेत्रात असेच प्रसिद्ध आहे. रामायण हे होमरच्य इलियडवरून भाषांतरित केलेले आहे, आणि भगवद्गीता ही ख्रिस्तोत्तरकालीन आहे असे सिद्धान्त पाश्चात्य विद्वानांनी मांडले होते. त्यांचे साधार सप्रमाण खंडण करून या दोन ग्रंथांचे खरे वैभव तेलंगांनी जगाला दाखवून दिले. त्यामुळे त्या वेळी त्यांना