पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७३८
 

कॅन्सरवरील यांचे संशोधन महत्त्वाचे मानले जाते. लंडन येथील रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिनचे हे सभासद होते. युनायटेड नेशन्सच्या सायंटिफिक कमिटीचे हे सभासद होते. ॲटॉमिक रेडिएशनचे परिणाम शोधून काढण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले.
 अलीकडे जयंत नारळीकर यांचे नाव जगविख्यात झाले आहे. गणित, ज्योतिष, पदार्थविज्ञान या शास्त्रांतील बहुमोल कार्यामुळे त्यांना जागतिक कीर्ती मिळाली आहे.

अगदी अल्प
 या शास्त्रज्ञांचे संशोधन मौलिक असे आहे. त्यापूर्वीच जी नामावळी दिली आहे तिच्यातील विद्वानांचे संशोधनही महत्त्वाचे आहे. जगाच्या ज्ञानात त्यांनी भर घातली हे खरे आहे. पण हे सर्व संशोधन तुलनात्मक दृष्टीने पाहता अगदी अल्प असे आहे. पाश्चात्य संस्कृती येथे येऊन शंभर सवाशे वर्षे झाली. नव्या पीठिका, नवी दृष्टी येथे निर्माण झाल्यालाही आता बराच काळ लोटला. तरीही जगाच्याच नव्हे तर भारतातील इतर प्रांतांच्या तुलनेने पाहता हे संशोधन क्षुल्लक वाटते, असे मो. वा. चिपळूणकरांनी म्हटले आहे. याचे कारण हेच की विद्येची उपासना अजून महाराष्ट्रीयांच्या अंगी मुरलेली नाही. वरच्या नामावळीत तर कित्येक लोक असे आहेत की एकदा पदवी मिळून सरकारी नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या विषयांकडे ढुंकूनही पाहिले नाही, मग संशोधनात आपण जगातील शास्त्रज्ञांची बरोबरी कशी करणार ? दुसरी एक गोष्ट मनाला खटकते. या संशोधकांत बहुसंख्य ब्राह्मणच आहेत. अलीकडे विद्येचा प्रसार ब्राह्मणेतरांतही झाला आहे. तरी विद्योपासनेचे व्रत घेतलेले त्यांच्यांत फार थोडे दिसतात. आणि अगदी अलीकडे तर विद्येची प्रतिष्ठाच नाहीशी होत चालली आहे. ब्राह्मणेतरांची किंवा अस्पृश्यांची बुद्धिमत्ता ब्राह्मणांपेक्षा तिळमात्र कमी नाही, हे शूद्रवर्णाच्या कर्तृत्वाचा इतिहास पाहता सहज दिसून येते. तेव्हा त्यांनी जर मनावर घेतले तर जगाच्या तुलनेला येईल असे संशोधन ते करू शकतील व महाराष्ट्राचे नाव उजळतील असा भरवसा मला वाटतो.

प्राच्यविद्या
 सृष्टिविज्ञानाप्रमाणेच प्राच्यविद्या आणि पुराणवस्तू यांचे संशोधन ब्रिटिश कालातच सुरू झाले. प्राच्यविद्या म्हणजे भारताच्या प्राचीन इतिहासाचा व संस्कृतीचा अभ्यास. येथले वेद उपनिषदे इ. प्राचीन वाङ्मय, शिलालेख, नाणी, ताम्रपट ही त्याची साधने. ही सर्व साधने ब्रिटिशकालापूर्वी येथे होतीच. पण, छांदोग्योपनिषदात म्हटल्याप्रमाणे, अज्ञानी माणसाला, तो ज्या भूमीवरून चालतो तिच्यात पुरलेले धन माहीत नसते, तशी आपली स्थिती होती. भारताची संस्कृती फार मोठी होती. पण इतिहास या कल्पनेचा उदय येथे कधी झालाच नाही, हे तिचे फार मोठे वैगुण्य होय. १७८५