पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२७
राजकारण
 

पडण्याचे आपल्याला काही कारण नव्हते. पण हिंदुमुसमानांचे ऐक्य हे महात्माजींचे उद्दिष्ट कधीच सिद्ध झाले नाही. महात्माजींनी सर्व प्रयत्न केले. पण शेवटी पाकिस्तान अटळ झाले आणि तरीही हिंदू मुस्लिमांचा प्रश्न सुटला नाही तो नाहीच.

विधायक कार्यक्रम
 खिलाफतीनंतर बार्डोलीच्या संग्रामाची महात्माजी सिद्धता करू लागले. पण कोठे हिंसाचार झाल्याचे वृत्त ऐकून आयत्या वेळी महात्माजींनी हा लढा स्थगित केला. त्यामुळे सर्व देशातील लोकांची फार निराशा झाली आणि सर्वांच्या पुढे, पुढे काय, असा प्रश्न निर्माण झाला. त्याला, विधायक कार्यक्रम, असे महात्माजींचे उत्तर होते. खादी, ग्रामोद्धार, अस्पृश्यता निवारण, मद्यपानबंदी, जातीय ऐक्य, मूलोद्योग, शिक्षण, गावसफाई, प्रौढशिक्षण इ. बहुविध कार्याचा विधायक कार्यक्रमात समावेश होता. पण संग्रामाची धार असल्यावाचून या कार्यक्रमाला तेज येत नाही. त्यामुळे लोकांना त्याचा लवकरच कंटाळा आला, आणि सर्व देश पुन्हा थंड झाला.

१९३०
 यानंतर खरा संग्राम झाला तो १९३० साली. आणि त्यानेच भारताचे भवितव्य पालटले. मध्यंतरीच्या काळात मुळशी, बोरसद, गुरुका बाग, नागपूर आणि १९२८ सालचा सरदार वल्लभभाई यांनी केलेला बार्डोलीचा संग्राम, असे स्थानिक सत्याग्रह लढे चालू होते. सायमन कमिशनवरील बहिष्काराला अखिल भारतीय रूप आले होते. पण खरा स्वातंत्र्यलढा १९३०-३१ सालीच झाला. त्या वेळचा सत्याग्रह अखिल भारतव्यापी झाला आणि लाखो लोकांनी सरकारी कायदा उधळून दिला. धारासना येथे २५०० लोकांनी मिठाचा कायदा तोडला. वडाळ्याला ही संख्या १५००० वर गेली. बागलाण, भीलवाड येथे एक लाख लोकांनी कायदेभंग केला. साक्री, पनवेल, बिळाशी, विरमगाव, विले पार्ले, शिरोडा अशा अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जागृत झाल्याचे स्पष्ट दाखवून दिले. कर्नाटकात तीन लाख ताडीची झाडे तोडण्यात आली. उत्तर प्रदेश, पंजाब, बंगाल, बिहार येथेही कायदेभंगाच्या चळवळीला असेच उधाण आले होते. मुंबई, सोलापूर, ही तर नित्याचीच रणक्षेत्रे झाली होती. मिठाचा, जंगलचा कायदा तोडणे, मद्यपान निरोधन करणे, करबंदी करणे, बेकायदा सभा, मिरवणुका काढणे इ. अनेक मार्गांनी लोकांनी राज्ययंत्राला हादरे देऊन ते खिळखिळे करून टाकले. यामुळे सरकार थोड्या तडजोडीला तयार झाले आणि महात्माजी गोलमेज परिषदेला गेले. पण तीतून काहीच निष्पन्न झाले नाही, त्यामुळे पुन्हा पहिली स्थिती कायम राहिली.

१९४२
 यानंतर १९४२ साली फिरून सत्याग्रह झाला. बेचाळीसची क्रांती म्हणून आपल्या