पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७२६
 

अशक्य म्हणून लोकांनी अहिंसा स्वीकारली होती. नेहरू, पटेल इ. नेत्यांनी महात्माजींना तसे स्पष्टच सांगितले होते. व्यवहार म्हणून आम्हांला अहिंसा मान्य आहे. तेव्हा १९२० ते १९४७ पर्यंत जे लढे झाले ते सर्व बहिष्कारयोगाचेच होते. खरा सत्याग्रह येथे झालाच नाही, असे गांधीजीच पुढे एकदा म्हणाले.
 पण असे असले तरी त्या स्वातंत्र्यलढ्यांचे महत्त्व मुळीच कमी होत नाही. लोकमान्यांनी फक्त त्याचे तत्त्वज्ञान सांगितले होते. आणि त्यासाठी ते जनतेला तयार करीत होते. पण तेवढ्यात ते कालवश झाले. तेव्हा बहिष्कारयोग प्रत्यक्षात आणून त्यायोगे स्वातंत्र्य मिळण्याचे श्रेय महात्माजी व त्यांचे सहकारी यांनाच आहे. महात्माजींचे नाव अजरामर होऊन राहील ते यामुळेच.

नवचैतन्य
 महात्माजींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह यशस्वी करून दाखविला होता. या मार्गाचे महत्त्व हेच आहे की सामान्यांतली सामान्य माणसे, जिवाणूसारखी सरपटत राहणारी माणसे, स्व, अस्मिता या शब्दांशी ज्यांची ओळखही नाही अशी माणसे, एकदम नवचैतन्याने भारून जातात. अत्यंत बलाढ्य अशा मदांध सत्तेशी लढा करण्याचे सामर्थ्य त्यांना येते. स्वसमाजासाठी, राष्ट्रासाठी, अन्यायाच्या प्रतिकारासाठी कष्ट सोसणे, तुरुंगवास पतकरणे, जरूर तर आत्मबलिदान करणे ही मनुष्यत्वाच्या उंचीची परिसीमा आहे. ती गाठण्याचा हा अभिनव मार्ग महात्माजींनी भारताला शिकविला व त्याच्याकडून तो आचरून घेतला. यातच त्यांचे अलौकिकत्व आहे.

सत्याग्रह संग्राम
 आफ्रिकेतील पुण्याई घेऊन गांधीजी भारताला आले आणि पहिला लढा त्यांनी चंपारण्यात केला. तेथेही हाच प्रत्यय आला. चहाच्या मळेवाल्याचा शिपाई पाहिला तरी तेथील मजूर लपून बसत. अशा लोकांना लढ्याला उद्युक्त करून महात्माजींनी तो संग्राम इतका यशस्वी केला की सहा महिन्यांत युरोपीय मळेवाले गाशा गुंडाळून परत गेले. खेडा जिल्ह्यातील लढ्याने युग पालटल्याचे चिन्ह स्पष्टपणे दाखवून दिले. दुष्काळ पडला होता तरी सरकारने दडपून सारावसुली चालविली होती. सत्याग्रहाचा मंत्र देऊन दीनदलित शेतकऱ्यांच्या साह्याने महात्माजींनी सरकारला नामोहरम केले. अहमदाबादला कामगारांचा लढा गांधीजींनी असाच यशस्वी करून दाखविला आणि यानंतर १९१९ साली 'रौलेट बिला' विरुद्ध जी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली तिला एकदम अखिल भारतीय रूप प्राप्त झाले. महात्माजींच्या कार्याला येथून खरा प्रारंभ झाला.
 पुढील वर्षी खिलाफतीची चळवळ झाली. मुसलमानांना स्वातंत्र्यलढ्यात सामील करून घ्यावे, असा महात्माजींचा त्यात हेतू होता. नाही तर तुर्कस्थानच्या भानगडीत