पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७२८
 

इतिहासात ती फार प्रसिद्ध आहे. पण या वेळी पहिल्या लढ्यातून निर्माण झालेले नेते- नेहरू, पटेल, राजाजी- यांना व महात्माजींना सरकारने प्रारंभीच अटक केल्यामुळे चळवळीची सूत्रे जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, नरेंद्र देव, अच्युतराव पटवर्धन, एस. एम्. जोशी इ. सोशॅलिस्ट नेत्यांच्या हाती गेली. त्यांचा व्यवहारी अहिंसेवरही विश्वास नव्हता. त्यामुळे चळवळीला घातपाताचे व दहशतवादाचे स्वरूप आले. हे आंदोलन फार प्रचंड झाले हे खरे. पण महात्माजींच्या मार्गाने हे झाले असते तर ते जास्त प्रभावी झाले असते. ते तसे झाले नाही. हळूहळू ते थंड पडत चालले. पण त्या वेळी दुसरे महायुद्ध सुरू होते. त्यातूनच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे लष्करी उठावणीचे कार्य सुरू झाले आणि भारताच्या इतिहासाला निराळेच वळण लागून त्याला स्वातंत्र्याचा लाभ झाला.

शेवटी लष्कर
 आरंभी सांगितलेच आहे की प्रारंभीचे मनरो, एलफिन्स्टन यांसारखे अधिकारी आणि मेकॉलेसारखे पंडित यांची अशी इच्छा होती की पाश्चात्य विद्या भारतात पसरावी आणि हिंदी लोकांचा कायापालट व्हावा. मग त्यामुळे ब्रिटिश साम्राज्य नष्ट झाले तरी चालेल. मात्र सर्व देशात पाश्चात्य विद्या पसरून येथे स्वतःचा राज्यकारभार करण्यास लोक समर्थ होईपर्यंत, लष्करात बंड होऊन आपली सत्ता जाऊ नये. तसे झाल्यास येथे अराजक माजेल व आपला व्यापारही बसेल. लष्करात उठावणी झालीच तर ती शेवटी व्हावी.
 ब्रिटिशांच्या इच्छेप्रमाणे तंतोतंत घडून आले. येथील मध्यम वर्गाने पाश्चात्य विद्या, पाश्चात्य शास्त्र हस्तगत केली. त्यांच्यात दादाभाई, रानडे यांच्यासारखे देशाला संजीवन देणारे पुरुष निर्माण झाले, आणि टिळक, महात्माजी यांसारखे नेते निर्माण होऊन, त्यांनी लोकजागृती करून, ब्रिटिशांना राज्य करणे अशक्य करून सोडले. आणि त्यानंतर मग सुभाषचंद्रांनी लष्करी उठावणी केली.

सुभाषचंद्र
 ही उठावणी म्हणजे महात्माजींच्या चळवळीचाच शेवटचा टप्पा होता. मागे सांगितलेच आहे की महात्माजींच्या चळवळीला सत्याग्रह असे नाव पडले असले तरी तो वस्तुतः बहिष्कारयोगच होता. ती निःशस्त्र प्रतिकाराची चळवळ होती. आचार्य जावडेकरांनी गांधीजीवनरहस्यात तसे स्पष्टपणे म्हटले आहे. शस्त्रसामर्थ्य नाही म्हणून निःशस्त्र प्रतिकार, असे नेहरू पटेल हे म्हणत असत. अहिंसेवर त्यांची मुळीच श्रद्धा नव्हती. निःशस्त्र प्रतिकाराने लोक जागृत व संघटित झाले म्हणजे सशस्त्र प्रतिकार ही पुढची पायरी होय. महात्माजींच्या चळवळीमुळे तो समय येताच नेताजी सुभाषचंद्र यांनी ती पुढची पायरी गाठली.