पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७१९
राजकारण
 

काही होईना. तेव्हा तिसऱ्या वर्षाच्या अधिवेशनात ह्यूम यांनी, लोकांत जागृती केली पाहिजे, सरकार जागे होण्याचे नाकारीत आहे, तेव्हा इंग्लंडमधील 'अँटी कॉर्न लॉ' सारखी चळवळ येथे सुरू केली पाहिजे, अशा तऱ्हेचे विचार मांडण्यास प्रारंभ केला. 'भारतमातेच्या पवित्र भूमीवर राहणारा प्रत्येक हिंदी मनुष्य, आमचा सहकारी, आमचा बंधू व गरज पडल्यास आमचा सैनिक झाला पाहिजे', असेही ते म्हणाले. काँग्रेसला असे वळण लागते, हे पाहून सरकारचे धोरण बदलले. प्रारंभी गव्हर्नर जनरल लॉर्ड डफरीन यांनी ह्यूम यांना उत्तेजन दिले होते. हयूम यांच्या मते, ही सामाजिक सभा असावी, असे प्रथम होते. पण तिचे स्वरूप राजकीय असावे, असा डफरीन यांनी आग्रह धरला. पण लोकजागृती हे तिला स्वरूप येताच त्यातील धोका सरकारला दिसू लागला. आणि काँग्रेसला जाण्यास लोकांना ते प्रतिबंध करू लागले. जे जातील त्यांच्याकडून जामीन मागण्यात येऊ लागले. पुढे सरकारी नोकरांनी काँग्रेसला जाता कामा नये, असा फतवा निघाला. त्यामुळे न्या. रानडे यांना काँग्रेस सोडावी लागली. पण जे नोकर नव्हते त्यांची स्थिती फारशी निराळी नव्हती. तेही मनातून घाबरून गेले होते. ह्यूमसाहेबांनी एक परिपत्रक काढून ते सर्व प्रांतांच्या काँग्रेस कमिट्यांकडे पाठविले होते. त्यात, लोकांत चळवळ केली पाहिजे, असा विचार मांडला होता. पण यामुळे राजद्रोह होईल अशी भीती वाटून, त्या कमिट्यांनी ते लोकांना वाटण्याचे नाकारले. पुढे ह्यूमसाहेब प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे मायदेशी जाण्यास निघाले तेव्हा, काँग्रेस इंग्लंडमध्येच भरवावी, असाही विचार नेमस्त पक्षीय लोकांनी केला. यावरून या पक्षातले थोर विचारवंत नेते, मनात देशभक्ती असूनही त्याग, धैर्य, प्रतिकार यापासून किती दूर होते हे कळून येईल.

नवी संस्कृती
 पण याच्या आधीच १८७४ साली विष्णुशास्त्री, आगरकर व टिळक यांनी एक नवी राजकीय संस्कृती निर्माण केली होती. लोकजागृती, संघटित प्रतिकारशक्ती व स्वातंत्र्याकांक्षा ही त्या संस्कृतीची प्रधान तत्त्वे होती. आणि त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याचे, हाल-अपेष्टा सोसण्याचे धैर्य त्यांच्या ठायी होते. ही संस्कृती त्यांनी निर्माण केली व ते असामान्य धैर्य प्रगट केले, म्हणूनच भारताचा इतिहास बदलला.

स्वाभिमान
 स्वभाषा, स्वधर्म व स्वदेश यांचा अभिमान जागृत करणे आणि त्यांच्या रक्षणासाठी वाटेल त्या त्यागास लोकांना सिद्ध करणे हे विष्णुशास्त्री यांचे उद्दिष्ट होते आणि १८७४ साली 'निबंधमाला' सुरू करून आणि ती सात वर्षे चालवून त्यांनी ते उद्दिष्ट साध्य करण्याचा पाया घातला. त्यांच्यापासूनच टिळक व आगरकर यांना स्फूर्ती झाली. पैकी आगरकर हे लवकरच कालवश झाले. पण टिळकांनी ते कार्य पुढे