पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७१३
राजकारण
 


दोन पक्ष
 ब्रिटिश कालात राजकीय चळवळ झाली ती साधारणपणे १८३२ ते १९४७ पर्यंत झाली. या कालखंडाचे राजकीय इतिहासाच्या दृष्टीने दोन टप्पे पडतात. एक १८७४ पर्यंतचा आणि एक त्यानंतरचा. पहिल्या विभागात ब्रिटिश राज्यकर्त्यांवर विश्वास हे मुख्य सूत्र होते. हिंदुस्थानचा उद्धार ब्रिटिशांकडूनच होणार आहे, या भूमीची प्रगती करण्यासाठी परमेश्वरी योजनेनेच ते आले आहेत, अशा प्रकारची श्रद्धा त्या काळात होती. १८७४ पासून विष्णुशास्त्री, आगरकर, टिळक हे नवे नेतृत्व निर्माण झाले आणि ब्रिटिश हे या भूमीचे शत्रू आहेत, त्यांच्या साम्राज्यशाहीचा संघटित शक्तीने प्रतिकार केल्यावाचून भारताला चांगले दिवस येणार नाहीत, असा या तरुण नेत्यांचा सिद्धांत होता. हे ब्रिटिशांवरील अविश्वासाचे राजकारण होय. पुढे पहिल्या पक्षाला नेमस्त, प्रागतिक किंवा मवाळ असे नाव पडले व दुसरा जहाल, राष्ट्रीय या नावाने ओळखला जाऊ लागला.

ब्रिटिशांवर विश्वास
 पहिल्या विभागातील प्रमुख नेते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, दादाभाई नौरोजी व न्या. मू. रानडे हे होत. यातील पहिले दोघे तात्त्विक चिंतन करून, लेख लिहून, केवळ विचारप्रवर्तन करणारे होते. दुसरे दोघे म्हणजे दादाभाई व रानडे हे तत्त्वचिंतकही होते व प्रत्यक्ष राजकारण करणारेही होते. या सर्वाच्या कार्याचे स्वरूप आता पाहू. 'दिग्दर्शन' या मासिकात १८४० साली बाळशास्त्री लिहितात, 'सांप्रत जेणे करून इंग्लिश लोकांचा अंमल दृढ बसेल, अशी कोणतीही गोष्ट जरी झाली, तरी तिचा खेद मानू नये. कारण इंग्लंडातील सरकार एथील सरकाराकरवी व इंग्लिश लोकांकरवी, या देशचे लोकांस विद्या शिकविण्याविषयी श्रम करीत आहे. या विद्या शिकविण्याने असे होईल की या देशचे लोकांस आपले राज्य करण्याचे सामर्थ्य होईल व कोणी लोकांस आपले राज्य करण्याचे सामर्थ्य असता, ते आपण राज्य न करता दुसऱ्या कोणाच्या ताब्यात राहिले, असे कोठे बखरांमध्ये (इतिहासात) दिसून येत नाही. याप्रमाणे या देशात घडून यावे, यात इंग्लिश लोक व या देशचे लोक या उभयतांचे कल्याण आहे. सुज्ञ इंग्लिश लोक हे जाणतच आहेत. त्यास नेटिव लोकांस सांप्रत इंग्रज लोकांप्रमाणे विद्वान मात्र झाले पाहिजे.'

सर्व बीजे
 यात स्वातंत्र्याची आकांक्षा स्पष्ट झालेली आहे आणि पाश्चात्य विद्या, इंग्रजी यंत्रणा, इंग्रजी संस्था हे त्याचे साधन होय, हा विचारही स्पष्टपणे मांडलेला आहे. ब्रिटिशांवरील विश्वास तो हाच होय. बाळशास्त्रींचा हा विश्वास आंधळा होता, असे