पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७१४
 

मात्र नाही. गावठी मालावर भारी जकाती बसवून ब्रिटिश मालावर मुळीच जकाती ठेवल्या नाहीत, यासाठी एल्फिन्स्टनवर त्यांनी टीका केली आहे. त्याचप्रमाणे हिंदी लोकांना कोणत्याही अधिकारपदावर नेमले नाही, याबद्दल त्यांनी टीका केली आहे. १८३३ साली ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश सरकारने नवी वीस वर्षांची सनद दिली. तीत जात, धर्म, प्रांत, देश यांवरून माणसा-माणसांत भेद केला जाणार नाही, सर्वांना योग्यतेप्रमाणे राज्यकारभारात स्थान दिले जाईल, असे आश्वासन दिलेले होते. पण प्रत्यक्षात तसे घडत नव्हते म्हणून, हे क्रूरपणाचे कृत्य आहे, अशी टीका 'दर्पण' या आपल्या पाक्षिकात बाळशास्त्री यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की 'विद्या ही कोणते एका देशातच असत्ये असे नाही आणि मनुष्य येथून तेथून सर्व सारखेच, हे बखरेवरून कळेल.' बाळशास्त्री यांची जी अवतरणे वर दिली आहेत त्यांवरून पुढील राजकीय चळवळीची सर्व बीजे त्यांच्या लेखनांतून दिसतात, हे कळून येईल. प्रारंभकाळीच महाराष्ट्राला असा पुरुष लाभला है भाग्य होय.

ईश्वरी योजना
 दुसरे त्या काळचे विचारवंत म्हणजे लोकहितवादी. 'ईश्वरी योजने' चा सिद्धान्त त्यांनीच प्रथम सविस्तर मांडला. 'पूर्वी हिंदू लोक शहाणे होते. आता त्यांचे शहाणपण नाहीसे झाले आहे. ते शहाणपण हिंदू लोकांस पुन्हा प्राप्त व्हावे एतदर्थ हा मुलुख ईश्वराने त्यांच्या ताब्यात दिला आहे.' असे ते म्हणतात. आणि असा शहाणपणा अंगी येऊन हिंदू लोक स्वतःचा राज्यकारभार करण्यास समर्थ होण्यास दोनशे वर्षे तरी लागतील, असेही त्यांनी सांगून ठेवले आहे. याबरोबरच इतरही अनेक राजकीय तत्त्वे त्यांच्या शतपत्रांतून त्यांनी विशद केलेली आहेत. एक महत्त्वाचे तत्त्व पाहा. 'इंग्रजात एक मेला की दुसरा तयार असतो. हा क्रम मराठी राज्यात नव्हता' या वाक्यात हिंदी समाजाचे खरे दुखणे आणि इंग्रज समाजाचे खरे बळ कशात आहे ते उत्तम रीतीने स्पष्ट झालेले आहे. अनेक कर्ते पुरुष उदयास येणे हाच खरा लोकशाही राज्यपद्धतीचा लाभ होय. आणि म्हणूनच राणी सरकारकडे अर्ज करून हिंदी लोकांनी पार्लमेंट मागून घ्यावे, असे लोकहितवादींनी म्हटले आहे. त्या त्यांच्या पत्रातही अनेक तात्त्विक सिद्धान्त आलेले आहेत. ते म्हणतात, 'या अर्जात लिहावे की हल्लीच्या राज्यपद्धतीपासून आमचा फायदा नाही. तीत आमचे राज्यासंबंधी हक्क चालत नाहीत व हिंदू लोक जसे तसे इंग्रज लोक मनुष्ये आहेत. याकरिता इनसाफ बरोबर होण्याकरिता, इंग्रज व नेटिव यांच्यात जो सांप्रत भेद आहे तो मोडून एकसारखे होण्याकरिता, हिंदुस्थानचे देशात पार्लमेंट ठेवावी व ही सभा मुंबईस भरवावी. या सभेत सर्व जिल्ह्यांतून सर्व जातीचे, भट, गृहस्थ, शास्त्री, परभू, कुळंबी, मुसलमान, इंग्रज इ. सर्व जातींचे जे शहाणे असतील ते नेमावे व त्यांनी राज्य चालवावे.'
 दुसऱ्या एका पत्रात, 'देश ही मातोश्री आहे,' असे सांगून त्यांनी राष्ट्रनिष्ठेचे