पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०५
आर्थिक साम्राज्यशाही
 

गावाने आपल्या गरजेचे सर्व पदार्थ आपल्या गावातच गावापुरतेच निर्माण करणे हे दुसरे तत्त्व होय. खादी ही मोठ्या गरजेची वस्तू. प्रत्येक कुटुंबाने चरखा चालवून ती बनवावी. कागद, तेल, इ. इतर पदार्थाची अशीच व्यवस्था करावी. यामुळे महायंत्रोत्पादन टळेल, शेतकरी भांडवलदारांच्या जोखडातून मुक्त होईल आणि त्याच्या मनाचा, बुद्धीचा विकास होऊन खरीखुरी लोकसत्ता प्रस्थापित होईल. या गरजेच्या वस्तू निर्माण करताना लहान लहान यंत्रे वापरण्यास हरकत नाही. पण एका खेड्यात किंवा फार तर दहापाच खेड्यांच्या गरजेइतकीच ती लहान असली पाहिजेत.
 यामुळे आजच्यासारखी सुधारलेली राहणी ग्रामीण जनतेला लाभणार नाही. पण तेच योग्य आहे. आपण आपल्या गरजा अत्यंत कमी करण्यास शिकले पाहिजे. आपण वैराग्याभिमुख झाले पाहिजे. यामुळे आपले जीवन अगदी अनाकर्षक होऊन आपल्या देशावर परचक्राची भीती राहणार नाही आणि त्यामुळे संरक्षणासाठी होणारा अवाढव्य खर्चही वाचेल. हीच पद्धती सर्वांनी अनुसरली तर राष्ट्राराष्ट्रातले कलह नाहीसे होऊन जगातली युद्धेही थांबतील.

विश्वस्त कल्पना
 भांडवलदार, जमीनदार, राजेमहाराजे हे रयतेचे शोषण करतात, तर त्यांची संपत्ती हिरावून घेऊन त्यांचा नाश करावा, असे कोणी म्हणेल. महत्माजींना ते मुळीच मान्य नव्हते. त्यांची संपत्ती त्यांच्याजवळच राहू द्यावयाची, पण त्यांनी ती स्वतःसाठी न वापरता जनतेचे विश्वस्त, निधिधारक म्हणून तिचा विनियोग करावा यासाठी त्यांचे हृदयपरिवर्तन घडवून आणावयाचे, हे महात्माजींच्या अर्थव्यस्थेतील महत्त्वाचे तत्त्व होते. ते म्हणत, जगात प्रज्ञा, बुद्धी, कर्तृत्व यांची विषमता राहणारच. रामराज्यातही ती असणार. भांडवलदार जमीनदारांना नाहीसे करून ती जाणार नाही. उलट अमाप संपत्ती निर्माण करण्याच्या त्यांच्या सामर्थ्याला समाज मुकेल आणि फार हानी होईल. तेव्हा भांडवलदार, जमीनदार, संस्थानिक यांचे रक्षण केले पाहिजे. त्यांना विश्वस्ताची भूमिका घेण्यास शिकविले की त्या पद्धतीतील दोष नाहीसे होतील व विषमताही नष्ट होईल.
 भांडवलदारी जमीनदारी यांच्यावर त्या वेळी समाजवाद हा मार्ग निघाला होता. भांडवलदारांच्या कारखान्यांचे राष्ट्रीयीकरण करावयाचे हे त्यातील मुख्य कलम होते. महात्माजींना हा समाजवाद मान्य नव्हता. राष्ट्रीयीकरण म्हणजे सरकारीकरण. या दोहोंत फरक काहीच नाही. चार भांडवलदारांच्या ऐवजी चार सरकारी अधिकाऱ्यांच्या हातात ते कारखाने जाणार. पण त्यामुळे धनाचे व सत्तेचे केंद्रीकरण टळत नाही. सोव्हिएट रशियात हेच चालले आहे. तेव्हा समाजवाद हा उपायच नव्हे. भांडवलदारांचे हृदयपरिवर्तन करून त्यांना विश्वस्त बनविणे, हाच योग्य उपाय होय. असे महात्माजी पुनः पुन्हा सांगत. अशा तऱ्हेचा वर्ग समाजाला आवश्यक आहे, याविषयी
 ४५