पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७०४
 

स्वदेशाला श्रीमंत करावयाचे होते आणि राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना ते घडू द्यावयाचे नव्हते. यातूनच हिंदुस्थानातली राजकीय चळवळ सुरू झाली.

व्यापक रूप
 बहिष्काराच्या चळवळीला लो. टिळकांनी पुढील एक दोन वर्षात अतिशय व्यापक रूप दिले. केवळ विलायती मालावरील बहिष्कार एवढाच त्याचा अर्थ राहिला नाही. सरकारच्या सर्व कारभारावर बहिष्कार, त्यानंतर साराबंदी आणि कायदेभंग येथपर्यंत त्यांनी ती चळवळ भिडविली आणि त्यामुळेच सरकारने त्यांच्यावर खटला भरून त्यांना सहा वर्षांची शिक्षा दिली.
 टिळकांना शिक्षा झाल्यावर बहिष्कारयोगाची चळवळ एकदम थंडावली. ते १९१४ साली सुटून आल्यानंतरही तिला पुन्हा जोम चढण्यास दोनतीन वर्षे लागली. तोपर्यंत महात्मा गांधींचा उदय झाला होता आणि चंपारण्य, खेडा जिल्हा येथील चळवळी आणि रौलेट ॲक्टाविरुद्ध त्यांनी उभारलेली भारतव्यापी सत्याग्रही चळवळ यामुळे कॉंग्रेसचे नेतृत्व त्यांच्याकडे जाऊ लागले आणि १९२० साली टिळक मृत्यू पावल्यावर ते पूर्णपणे त्यांच्याकडे गेले.
 महात्माजींनी राजकीय चळवळ कशी केली त्याचे वर्णन त्या प्रकरणात येईलच. पण या राजकीय चळवळीमागे त्यांचे जे एक स्वतंत्र आर्थिक तत्त्वज्ञान होते त्याचा विचार येथे करावयाचा आहे.

महात्माजी
 महात्माजींना पाश्चात्य भौतिक संस्कृतीचा अत्यंत तिटकारा होता. भांडवलदारी आणि अवाढव्य यंत्रसृष्टी ही तिची दोन प्रमुख लक्षणे. नव्या यंत्रसामग्रीमुळे फार प्रचंड प्रमाणावर मालाची निपज होते. आणि तीमुळे धनाचे आणि पुढे त्यामुळेच सत्तेचेही भांडवलदारांच्या हातात केन्द्रीकरण होते. या दुहेरी सत्तेच्या जोरावर ते कामगारांची पिळणूक करतात, त्यांचा रक्तशोष करतात आणि सर्व समाजावर प्रभुत्व प्रस्थापित करून पराकाष्ठेची विषमता निर्माण करतात आणि त्यामुळे सर्व समाज शेवटी रसातळाला जातो.

ग्रामवाद
 यावर उपाय काय ? 'ग्रामवाद' हे गांधीजींचे त्यावर उत्तर आहे. डॉ. भारतन् कुमाराप्पा यांनी 'पुंजीवाद, समाजवाद व ग्रामवाद' या आपल्या पुस्तकात महात्माजींच्या ग्रामवादातील अर्थशास्त्राचे सविस्तर विवेचन केले आहे. महायंत्रोत्पादनामुळे संपत्तीचे व सत्तेचे केंद्रीकरण होते, म्हणून त्या महायंत्रोत्पादनावर बहिष्कार, त्याचा त्याग हे त्यातील पहिले तत्त्व आहे. हिंदुस्थान ग्रामप्रधान आहे. तेव्हा प्रत्येक