पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
४६
 

णवमत्थ दंसणं संनिवेस सिसिराओं बंध रिद्धिओ ।
अविरलमणिओ आभुवनबंधमिह णवर पयमक्ति ॥

 सृष्टीच्या आरंभापासून आजपर्यंत अभिनव आशय, समृद्धरचना आणि मृदुशब्दमाधुर्य या बाबतीत प्राकृत भाषा सर्व भाषांत श्रेष्ठ आहे. त्यानेच पुढे म्हटले आहे की जल हे सागरापासून निर्माण होते व ते सागरातच विलीन होते. त्याप्रमाणे सर्व भाषा प्राकृतातून निर्माण होतात व प्राकृतातच विलीन होतात. प्राकृतापासून मनाला अनिर्वचनीय आनंद होतो. त्या आनंदाने नेत्र विकसित होतात व तृप्तीने मुकुलितही होतात.
 'वज्जालग्ग' हा जयवल्लभाने रचलेला ग्रंथ गाथासप्तशतीसारखाच सुभाषित- भांडाराच्या स्वरूपाचा आहे. त्यात कवी म्हणतो,

ललिए महुरक्खए जुबई-यण बल्लहे ससिंगारे |
संते पाइय कव्वे को सक्कइ सक्कयं पढिऊं ? ॥

 लालित्यपूर्ण, मधुर युवतींना प्रिय असलेले व शृंगाररसयुक्त प्राकृत काव्य उपलब्ध असताना संस्कृत कोण वाचणार ?
 महाराष्ट्री प्राकृतातील पहिले अभिजात काव्य म्हणजे 'गाथासप्तशती' हे होय. त्यात आरंभीच

अमिअं पाऊअ काव्यं पढिऊं सोऊं अजेण अणंति
कामस्स तत्ततंतिं कुणतिं ते कहं ण लज्जति ?

 असा प्राकृत भाषेचा व काव्याचा अभिमान कवीने प्रगट केला आहे. तो म्हणतो- प्राकृत काव्य शृंगाररसाच्या पूर्णतेमुळे अमृतरूप आहे. ( त्या प्राकृत काव्यास अशिष्ट समजून ) ते पढणे व ऐकणे जे जाणत नाहीत त्यांना मदनाची तत्त्वचिंता करताना लज्जा कशी वाटत नाही ?
 कवीने प्रगट केलेला प्राकृत काव्याबद्दलचा हा अभिमान संस्कृत कवींनाही मंजूर होता, हे अनेक संस्कृत कवींनी गाथासप्तशतीचा जो गौरव केला आहे त्यावरून दिसून येते. 'कादंबरीचा' कर्ता सुप्रसिद्ध कवी बाण म्हणतो,

अविनाशिनमग्राम्यं अकरोत् सातवाहनः ।
विशुद्धजातिभिः कोशं रत्नैरिव सुभाषितैः ।

 प्राकृत भाषेचा हा अभिमान तिचे सौकुमार्य, सौंदर्य एवढ्यापुरताच मर्यादित नाही. शिक्षण, लोकव्यवहार या सर्व क्षेत्रात प्राकृताचा आश्रय केला पाहिजे असे तिच्या उपासकांचे म्हणणे आहे.

प्राकृत हे मूळ
 संस्कृताचा अपभ्रंश होऊन प्राकृत निर्माण झाली हे प्राकृताच्या अभिमान्यांना मुळीच मान्य नाही. संस्कृत पंडितांचा मात्र तसा आग्रह आहे. संस्कृत ही दैवी भाषा व तिच्यापासून जन्मलेली ती प्राकृत असे दण्डीने म्हटले आहे. चंड, वाग्भट या