पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४७
अस्मितेचा उदय
 

पंडितांचेही असेच मत आहे. इतकेच नव्हे, तर प्राकृताचा प्रसिद्ध व्याकरणकार हेमचंद्र हाही 'प्रकृतीः संस्कृत, तद्भवं, तत् आगतं - प्राकृतम् ' असेच म्हणतो. पण प्राकृताचे अभिमानी निराळी व्युत्पत्ती व उपपत्ती सांगतात. प्राक् - पूर्व-कृत- प्राकृतम् । पूर्वी, संस्कृतच्या आधी झालेली, ती प्राकृत. किंवा लोकव्यवहार म्हणजे प्रकृती - तत्रभवं सव प्राकृतम् | अशी व्याख्या ते देतात. त्यांची हीच विचारसरणी आज पंडितांना मान्य झालेली आहे. संस्कृत ही सर्व लोकांची भाषा असणे कदापि शक्य नाही. शास्त्री- पंडित ती तत्त्वविवेचनासाठी, ग्रंथरचनेसाठी योजीत असले तरी लोकव्यवहार संस्कृतात होणे शक्य नव्हते. लोकांना तत्त्वनिरूपण समजावे म्हणून प्राकृताचाच आश्रय केला पाहिजे, आणि अशी लोकसुलभ जी भाषा तीच श्रेष्ठ, असा अभिमान अनेक पंडितांनी मागल्या काळीसुद्धा प्रगट केलेला आहे. जैन पंडितांनी तर या बाबतीत संस्कृतवादी लोकांचा धिक्कार केला आहे.

संस्कृता प्राकृता चेति भाषे प्राधान्यमर्हतः ।
तत्रापि संस्कृता तावद् दुर्विदग्ध हृदि स्थिता ॥

वास्तविक संस्कृत व प्राकृत दोन्ही भाषा महत्त्वाच्या आहेत. पण दुराग्रही संस्कृत पंडित तरीसुद्धा संस्कृतलाच कवटाळून बसतात.

बालस्त्रीमंदमूर्खाणां नृणां चारित्रकांक्षिणाम् |
अनुग्रहार्थं तत्त्वज्ञैः सिद्धान्तः प्राकृतः कृतः ॥

बाल, स्त्रिया, जडबुद्धी, मूर्ख यांच्यासाठी, धर्मनीती जाणण्याची इच्छा असलेले यांच्यासाठी, तत्त्ववेत्त्यांनी प्राकृतात धर्मसिद्धान्त सांगितले आहेत, असे सांगून हा पंडित पुढे म्हणतो, ही भाषा बालांना अती सद्बोधकारिणी आहे, कर्णपेशला - श्रुति- मधुर आहे, तरी हटाग्रही लोकांना ती मान्य होत नाही.
 'कुमारपाल' या काव्याचा कर्ता म्हणतो, ' आदी पुरुषाने प्रथम १४ स्वर व ३८ व्यंजने करून प्राकृत भाषा केली आणि मग तीवर संस्कार झाल्यामुळे संस्कृतभाषा झाली. तेथून पुढे अनेक भाषाभेद झाले. तेव्हा, सकलशास्त्रमूलं मातृकारूपं प्राकृतमेव प्रथमम् । '
 प्राकृत ही सुलभ असल्यामुळे अध्यापनासाठी तिचा उपयोग संस्कृतावरोवर करावा, असा उपदेश काही प्राचीन पंडितांनी केलेला आढळतो.

नात्यंतं संस्कृतेनैव, नात्यंतं देशभाषया ।
कथा गोष्टीषु कथयन् लोके बहूमतो भवेत् । कामसूत्रे १, ४, १०

केवळ संस्कृत नव्हे, केवळ देशभाषा ( प्राकृत ) नव्हे, तर दोहींचा अवलंब करून जो निरूपण करतो त्यालाच लोकात बहुमान मिळतो.

संस्कृतैः प्राकृतैर्वाक्यैः यः शिष्यमनुरूपतः ।
देशभाषाद्युप यैश्च बोधयेत् स गुरुः स्मृतः ॥ विष्णुधर्मोत्तरे.

प्रसंगाप्रमाणे संस्कृत, प्राकृत व देशी भाषा यातून जो शिष्यांना बोध करील त्यालाच गुरू म्हणावे.