पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०
आर्थिक साम्राज्यशाही
 

स्थितीची पाहाणी करण्याचे कार्य सभेने अंगावर घेतले. १८७६-७७ साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला, तेव्हा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना साहाय्य करण्याचे व शेतकऱ्यांची गाऱ्हाणी सरकारपुढे ठेवून त्यांची दाद लावण्याचे कार्य सभेने केले. शेतकऱ्यांतर्फे सरकारकडे दाद मागण्याची ही हिंदुस्थानातील पहिली चळवळ होय.

प्रागतिक व राष्ट्रीय
 यापुढच्या राजकारणात हळूहळू मवाळ आणि जहाल किंवा प्रागतिक आणि राष्ट्रीय पक्ष स्पष्ट होऊ लागले. हिंदुस्थानच्या दारिद्र्याची पूर्ण, स्पष्ट कल्पना ब्रिटिश लोकांना, ब्रिटिश पार्लमेंटला द्यावयाची, त्याची कारणमीमांसा त्यांना पटवून द्यावयाची आणि त्यांच्या न्यायबुद्धीला आवाहन करून येथे सुधारणा घडवून आणावयाच्या, असे प्रागतिक पक्षाचे धोरण होते. या बाबतीत रानडे यांना ना. गोखले हा उत्तम शिष्य मिळाला. आणि गोखले यांनी प्रागतिक पक्षीय धोरणाच्या दृष्टीने पाहता खरोखरच उत्तम कामगिरी केली. दुसरा म्हणजे राष्ट्रीय पक्ष हा टिळक-आगरकरांचा पक्ष होय. हिंदुस्थानचे दैन्य, दारिद्र्य हे ब्रिटिशांना पूर्णपणे माहीत आहे, याची कारणमीमांसाही त्यांना ठाऊक आहे, किंबहुना त्यांनीच ही परिस्थिती जाणून बुजून निर्माण केली आहे, तेव्हा त्यांना युक्तिवादाने काही पटवून देणे, याला काही अर्थ नाही, असे या पक्षाचे मत होते. निजलेल्याला जागे करणे शक्य आहे, पण जाग्याला जागे कसे करणार? तेव्हा या बाबतीत निराळाच मार्ग अनुसरला पाहिजे आणि तो मार्ग म्हणजे लोकांना जागृत करणे, लोकशक्ती संघटित करणे, हा होय, असे या पक्षाचे मत होते. या दोन्ही मतांच्या लोकांनी पुढच्या दहावीस वर्षांत आपापल्या धोरणाप्रमाणे आर्थिक क्षेत्रात कसकसे प्रयत्न केले ते आता थोडक्यात पाहू.

वेल्वी कमिशन
 १८९६ साली ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानची आर्थिक पाहणी करण्यासाठी वेल्बी कमिशन नेमले. हे कमिशन नेमून घेण्यामागे दादाभाईचा हात होता. ते त्याचे एक सभासदही होते. ब्रिटिश राज्यपद्धतीमुळे हिंदुस्थान भिकारी होत चालला आहे, हे पार्लमेंटला पटवून देऊन हिंदी राज्यकारभारात हिंदी लोकांचा अधिकाधिक प्रवेश करून घ्यावा, असा त्यांचा प्रधान हेतू होता. या कमिशनपुढे सुरेंद्रनाथ बॅनजी, दिनशा वाच्छा, सुब्रह्मण्य अय्यर यांच्या बरोबरच ना. गोखले यांची साक्ष झाली. गोखले यांची साक्ष अत्यंत मुद्देसूद, आणि उत्कृष्ट झाली. इतकी की लोकमान्य टिळकांनी सुद्धा त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

१८ वर्षे दुष्काळ
 १९०१ साली राष्ट्रसभा अहमदाबादला झाली. त्या वेळी बाबू सुरेंद्रनाथ बॅनर्जी