पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६९९
आर्थिक साम्राज्यशाही
 

क्रांतीमुळे निरनिराळ्या प्रकारचा पक्का माल यंत्राच्या साह्याने फार सुबक व स्वस्त होऊ लागला आणि तो हिंदुस्थानात आयात होऊ लागल्यावर येथील ग्रामीण व नागर उद्योगधंदे सफाई बुडाले. इंग्रजी मालामुळे येथले कारागीर तर बुडालेच, पण पोटाचा उद्योग नसल्यामुळे त्यांचा सर्व भार शेतीवर पडला आणि येथल्या शेतीला आणखीच अवकळा आली.

व्यापारी - दलाल
 प्रारंभी इंग्रजांनी रस्ते आणि वाहतुकीची साधने यांत सपाट्याने वाढ केली, त्याचप्रमाणे कालवेही काढले व विहिरीही खणल्या. याच वेळी इंग्लंडमध्ये कच्च्या मालाची मागणी वाढली. त्यामुळे शेतकरी जमिनीत व्यापारी पिके- मुख्यतः कापूस- काढू लागला. १८६० साली अमेरिकेत यादवी सुरू झाली. तेथला माल इंग्लंडला येईना. त्यामुळे भारताच्या कापसाला मागणी फारच वाढली. वऱ्हाडातल्या जमिनी त्या काळात सोन्याच्या तुकड्यासारख्या झाल्या. पण अमेरिकेतील युद्ध संपल्यावर मंदी आली आणि त्यात हजारो शेतकरी बुडाले. व्यापारी वर्गाची स्थितीसुद्धा फारशी स्पृहणीय नव्हती. इंग्रजी मालाचे दलाल असे त्यांना रूप येऊ लागले. अर्थात शेतकऱ्याप्रमाणे हा वर्ग दरिद्री झाला नाही. पण हिंदुस्थानच्या अर्थव्यवहाराच्या दृष्टीने पाहता हिंदुस्थानच्या शोषणातच यामुळे वाढ झाली यात शंका नाही.

कारखानदारी
 हे झाले शेती आणि व्यापाराचे. यानंतर कारखानदारीचा विचार करावयाचा. हळूहळू येथे यांत्रिक उद्योगांची सुरुवात झाली. १८५३ साली मुंबईत कापडाची गिरणी निघाली. त्यानंतर नागपूर, सोलापूर येथेही कापडाच्या गिरण्या निघू लागल्या. आजतागायत महाराष्ट्रात कापड गिरण्या हा सर्वात मोठा उद्योग आहे. दुसरा उद्योग म्हणजे साखर कारखाने. १९३१ साली साखरेच्या धंद्यास संरक्षण मिळाले व तेव्हापासून महाराष्ट्रात साखरेच्या गिरण्यांची वाढ होऊ लागली. मधल्या काळात, काच, लोखंडी नांगर, काचेचे दिवे असे बारीकसारीक यांत्रिक उद्योग सुरू झाले. टाटा, बिर्ला, वालचंद, ही मोठी नावे, आणि किर्लोस्कर, ओगले ही बारकी नावे या क्षेत्रांत ऐकू येऊ लागली.

मँचेस्टर राज्य
 पण आपण एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की ब्रिटिशांनी हिंदुस्थान जिंकला तो त्यांचा व्यापार व उद्योग वाढावा म्हणून, हिंदुस्थानची भरभराट व्हावी म्हणून नव्हे. १८८० साली हिंदुस्थानात येणाऱ्या ब्रिटिश मालावरची जकात मँचेस्टरवाल्यांनी कमी करावयास भाग पाडले आणि गरीब रयतेला तो माल स्वस्त मिळावा हा