पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६९८
 

गोडवे गाणारे माधवराव देशद्रोही आहेत' असे केसरीने एका लेखात स्पष्टपणे सूचित केले. 'थंड गोळा झालेल्या महाराष्ट्राला माधवरावांनीच चैतन्य दिले' असे धन्योद्गार पुढे टिळकांनीच रानड्यांसंबंधी काढले आणि ते अक्षरशः खरे होते. तरी त्यांनी या वेळी त्यांना देशद्रोही ठरविले. यावरून त्यांच्यातील मतभेद किती विकोपाला गेले होते हे ध्यानात येईल.

शेतकरी - कर्जबाजारी
 पण हे काही असले तरी शेती, व्यापार आणि कारखाने यांची वाढ झाल्यावाचून या देशाची उन्नती होणार नाही आणि परकी राज्य असे तोपर्यंत ही उन्नती होणार नाही, हा सिद्धान्त हळूहळू हिंदी लोकांच्या मनात ठसू लागला. इंग्रजी अंमल सुरू झाल्याबरोबर महाराष्ट्रातील शेतकरी जमिनीचा मालक झाला. पूर्वी मिराशी, कुळे सोडली तर तो मालकच होता, पण जमीन गहाण टाकणे किंवा विकणे हा अधिकार त्याला नव्हता. तो आता प्राप्त झाला. त्यामुळे परिणाम मात्र विपरीत झाला. शेतकरी पूर्वीपासूनच कर्जबाजारी होता. पण आता सावकार लोक मुक्त मनाने कर्ज देऊ लागले; कारण फिटले नाही तर त्याची जमीन त्यांना घेता येऊ लागली. त्यामुळे शेतकरी भराभर आपल्या जमिनीला मुकू लागला. तो इतका की काही ठिकाणी बंडे होऊ लागली, म्हणून मग 'डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट' यांसारखे कायदे करून सरकारला या अनर्थाला आळा घालावा लागला. तरी कर्जापायी दीनदरिद्री झालेला शेतकरी, हे त्याचे रूप अजूनही पालटलेले नाही.

व्यापारी वर्ग नाही
 याच्या जोडीला दुसरे एक संकट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आले. पूर्वीपासून होतेच. पण आता ते दसपट वाढले. मागे सांगितलेच आहे की महाराष्ट्रात वैश्यवर्ग नाही. दुर्गादेवीच्या दुष्काळात तो जो नाहीसा झाला तो कायमचा. त्यामुळे येथे गुजर आणि मारवाडी यांचे आर्थिक साम्राज्य सर्वत्र पसरले. यात त्यांचा दोष काही नाही. कारण त्या वेळी त्यांना मराठ्यांनी सन्मानाने बोलावूनच त्यांच्या हाती व्यापारी सूत्रे दिली होती. इंग्रजी अमलात वर सांगितल्याप्रमाणे त्यांची पकड जास्त घट्ट झाली. आणि मराठा सधन वर्ग शेतकऱ्यांतून निर्माण व्हावयाचा तो येथे मुळीच झाला नाही. यामुळे येथला शेतकरी कायमचा कफल्लक होऊन बसला आहे.

कारागीर बुडाले
 जे शेतकऱ्यांचे तेच कारागिरांचे व व्यापाऱ्यांचे. कच्च्या मालाची निर्यात व पक्क्या मालाची आवक, असे इंग्रजी राज्यात अर्थव्यवस्थेला हळूहळू रूप आले. याचे हिंदी अर्थव्यवस्थेवर फार दूरगामी परिणाम झाले. इंग्लंडमधील औद्योगिक