पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६९७
आर्थिक साम्राज्यशाही
 

करतात, त्यांना पगार मिळणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे इंग्रजी भांडवलदार आपल्याला कमी व्याजाने कर्ज देतात आणि या देशाच्या औद्योगिक उन्नतीला हातभार लावतात, म्हणून आपण त्यांचे ऋणी असले पाहिजे, असे ते म्हणत असत.

जहाल- मवाळ
 दादाभाई आणि रानडे यांच्या या भिन्न मतप्रणालीमुळेच पुढे जहाल व मवाळ किंवा राष्ट्रीय व प्रागतिक पक्षांचा येथे उदय झाला. दादाभाईच्या आर्थिक विचारसरणीवरच विष्णुशास्त्री, आगरकर व टिळक यांनी आपल्या जहाल पक्षाची उभारणी केली होती.

आधी राजकारण
 'आमच्या देशाची स्थिती' या लेखात विष्णुशास्त्री यांनी म्हटले आहे की आमच्या प्रस्तुतच्या दैन्याचे मुख्य कारण परकी अंमल हे उघडच होय. इंग्रज लोक इकडे प्रभू होण्यापूर्वी हा देश संपन्न होता. मुसलमानांची जुलमी राजवट सांप्रतच्या स्थितीहून शंभरपट बरी होती. तेव्हा आमच्या पाश्चात्य बंधूंचे आधिपत्य हे जर आमच्या विपत्तीचे मोठे कारण होय, तर ते नाहीसे झाले असता आमची स्थिती सुधारेल, ही अर्थातच कोणाच्याही मनात प्रथम कल्पना होणार आहे.'
 आगरकरांनी हेच मत प्रतिपादिले आहे. ते सामाजिक सुधारणेचे कडवे पुरस्कर्ते होते. पण एके ठिकाणी ते म्हणतात, 'अगोदर जगणे आणि मग चांगल्या रीतीने जगणे! विशिष्ट प्रकारच्या राजकीय व्यवस्था समाजाच्या अस्तित्वाला अवश्य आहेत. सामाजिक सुधारणांची तशी गोष्ट नाही. जातिभेद, बालविवाह, वगैरे दुष्ट चालींपासून आम्हांस पुष्कळ त्रास होत आहे. पण मिठावरील जबरदस्त कर, दर तीस वर्षांनी येणारा रेव्हिन्यू सर्वेचा फेरा व यमोदराप्रमाणे प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये भक्ष्यस्थानी पडले तरी फिरून हपापल्यासारखे करणारे लष्करी खाते इत्यादिकांपासून होणारा जो त्रास त्यापुढे सामाजिक दुराचारापासून होणारा त्रास काहीच नाही' (निबंधसंग्रह, भाग ३ रा, पृ. ११५-१६). दादाभाईच्या आर्थिक तत्त्वज्ञानावर या तरुणांनी आपल पक्ष उभारला, असे म्हटले आहे. पण इंग्रज रक्तशोष करीत आहेत, असे मत असूनही दादाभाईचा इंग्रजांवरचा विश्वास कायम होता, तो मात्र नव्या पिढीत अल्पांशानेही राहिला नाही. हे राज्य गेल्यावाचून येथे कसलीही आर्थिक सुधारणा शक्य नाही, असेच या तरुणांचे व त्यांच्या प्रतिपादनातून पुढे उदयास आलेल्या जहाल पक्षाचे ठाम मत झाले होते.

तीव्र मतभेद
 या दोन पक्षांच्या प्रवर्तकांमध्ये इतके तीव्र मतभेद होते की 'परदेशी भांडवलाचे