पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६९६
 


उपासमारीने मरणे
 इंग्रज लोकांनी येथे भांडवल गुंतवू नये असे नाही, पण त्यांनी ते भांडवल स्वतःचे आणावे. इतर देशांत इंग्रज भांडवल देतात, पण तेथे त्यांना फक्त भांडवलाचे व्याज मिळते. हिंदुस्थानातील प्रकार याहून भिन्न आहे. इंग्रज लोक भांडवल घेऊन या देशावर स्वारीच करतात. या भांडवलाच्या साह्याने जे धन निपजेल ते त्यांचेच देशबांधव बहुतांशी या देशात खातात आणि उरलेले धन नफ्याच्या किंवा डिव्हिडंडच्या रूपाने घेऊन जातात. आज हिंदुस्थानात दर माणशी वार्षिक उत्पन्न वीस रुपये आहे. हे उत्पन्न सरकार येथे तुरुंगातील कैद्यांसाठी जो खर्च करते त्याहून कमी आहे, हे दादाभाईंनी सप्रमाण सिद्ध केले. त्यावरून ते म्हणतात की हिंदुस्थानातील लक्षावधी जनतेचे जीवन म्हणजे अर्धपोटी, उपासमारीने मरणे अथवा दुष्काळाने किंवा रोगाच्या साथीने मरणे, असेच आहे.

दरसाल महंमद गझनी
 हा सर्व हिशेब देऊन त्यांनी म्हटले आहे की महंमद गझनीने १८ स्वाऱ्यांत जी संपत्ती येथून लुटून नेली तिच्यापेक्षा जास्त संपत्ती इंग्रज दरसाल येथून नेत आहे. तेव्हा काही लोक म्हणतात की इंग्रजी राज्यात जीविताची शाश्वती आहे, ते अगदी भ्रामक आहे. जर काही सुरक्षित असेल तर ते इंग्लंड! ते मात्र सुरक्षित व अबाधित आहे.

स्वराज्य- संदेश
 दादाभाई सतत पन्नास वर्षे या विषयाचे मनन, चिंतन आणि लेखन करीत होते. आणि शेवटी स्वराज्यावाचून हे प्रश्न सुटणार नाहीत, इंग्लंडने चालविलेला हा रक्तशोष थांबणार नाही, या निर्णयाप्रत ते आले आणि तसा संदेश १९०६ च्या काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी दिला. राजकीय सुधारणा म्हणजे स्वराज्य हेच मुख्य कार्य होय, बाकी सर्व सुधारणा या गौण आहेत, असे या दीर्घकालीन चिंतनामुळे त्यांचे मत झाले होते. कारण स्वराज्यावाचून कोणतेच प्रश्न सुटणार नाहीत, असे ठामपणे त्यांना वाटू लागले होते.

रानडे- मतभेद
 न्या. मू. रानडे यांना दादाभाईची ही मते तितकी मान्य नव्हती. इंग्लंडकडे पैशाचा ओघ वहात आहे व त्यामुळे हिंदुस्थान दरिद्री होत आहे, हे त्यांना मान्य होते. फिनान्स कमिटीपुढे दादाभाईंनी जी साक्ष दिली तिच्यातील विचार त्यांनी दोन व्याख्याने देऊन महाराष्ट्रीयांना समजावून दिले होते. पण असे असले तरी त्यात अन्याय आहे, ही लूट आहे हे म्हणणे बरोबर नाही, असे त्यांचे मत होते. इंग्रज अधिकारी येथे काम