पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६९५
आर्थिक साम्राज्यशाही
 

परदेशातील आहे. यामुळे व्यापार बुडाला. उमदी, मजूर, कसबी, कारागीर, घरी बसले. यास्तव सर्वांनी असा कट करावा की जे आपल्या देशात पिकेल तेच नेसू, तेच वापरू. कापूस विकणारांनी असा बेत करावा की इंग्रजांना कापूस देऊ नये, इकडे तयार केलेली कापडे द्यावी. असे झाले म्हणजे लोक सुखी होतील. सध्या परदेशच्या भुलावणीने हाहाकार झाला आहे. तेव्हा पुराणिक, हरदास यांनी लोकांस या गोष्टी समजावून सांगाव्या. पण त्या टाकून दुसऱ्या गोष्टी सांगतात ' (पत्र क्र. ५७).

परदेशी जावे
 अर्थकारणातील आणखी एक दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी लोकहितवादींनी सांगितल्या आहेत. 'येथल्या लोकांना पैशाचा उपयोग माहीत नाही. ते पैसा दागिन्यांत घालतात किंवा ब्राह्मणभोजने करतात. त्याऐवजी त्यांनी व्यापारात पैसा घालावा. पण लोक मूर्ख आहेत. त्यांस हे कळत नाही की द्रव्य ही चालती वस्तू, जितकी अधिक फिरेल तितकी चांगली.' 'आपल्या लोकांनी परदेशात जाऊन राहावे व तेथे व्यापार करावा. परदेशी न जाण्याचे शास्त्र मोडावे. युगपरत्वे शास्त्र फिरविले पाहिजे. असे केल्याने लोक बलवान होतील.' नव्या अर्थशास्त्राची सर्व तत्त्वे यात सूत्ररूपाने आली आहेत.

दादाभाई
 पण या क्षेत्रात खरे मोठे कार्य केले ते पितामह दादाभाई यांनी. १८७१ साली फिनान्स कमिटी पुढे इंग्लंडात त्यांनी साक्ष दिली. तीत, इंग्रजांनी अनेक मार्गांनी हिंदुस्थानचा रक्तशोष कसा चालविला आहे, ते अगदी निर्भयपणे स्पष्ट करून सांगितले. येथले युरोपीय अधिकारी येथे पैसा साठवून विलायतेस पाठवितात. इंग्लंडात नेमलेल्या लोकांना पगार आणि पेन्शन मिळतात ती हिंदुस्थानच्याच पैशातून. येथल्या संपत्तीला गळती लागली तिचा हा एक प्रकार. आणि दुसरा प्रकार म्हणजे हाच पैसा भांडवलरूपाने भारतात आणून येथल्या व्यापाराचा व उद्योगाचा त्यांनी मक्ताच मिळविला आहे. या मार्गाने येथल्या द्रव्याचे ते किती हरण करतात त्याला गणतीच नाही. दादाभाईच्या मते सर्व अधिकारांच्या जागांवर हिंदी माणसाची नेमणूक केली पाहिजे. परकी माणसाला दिलेली प्रत्येक पै राष्ट्रीय दृष्ट्या तोटा आहे. इंग्रज लोक आपल्याला भांडवल पुरवितात, म्हणून आपण त्यांचे ऋणी असले पाहिजे, असे न्या. मू. रानडे यांचे मत होते. पण दादाभाई म्हणत, हे भांडवल त्यांनी हिंदुस्थानातूनच मिळविलेले असते. तेव्हा त्यात उपकार वगैरे काही नाही. तेव्हा हा पैशाचा ओघ प्रथम थांबला पाहिजे. हे रक्तशोषण एकदा थांबले की हिंदुस्थान आपली नैसर्गिक संपत्ती, आपले श्रम, आपले भांडवल यांच्या साह्याने इंग्लंडप्रमाणेच श्रीमंत होईल.