पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८९
समाज परिवर्तन
 

समाजात सामावून घेतले. त्यांतील कित्येक जमातींना तर क्षत्रिय, ब्राह्मण अशा श्रेष्ठ वर्णातही त्यांनी प्रवेश दिला. त्यामुळेच हिंदुसमाज सातव्या आठव्या शतकापर्यंत पुष्कळ अंशी एकरूप व बलाढ्य झाला. वर उल्लेखिलेल्या आदिवासी जमातींना त्याकाळीच असे आपल्यात समाविष्ट करून घेतले असते तर आज ही समस्या निर्माणच झाली नसती आणि हिंदुसमाजाला दौर्बल्य आले नसते.

अखंड सेवा
 स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने आदिवासींच्या उद्धारार्थ एक स्वतंत्र खाते निर्माण केले आहे. त्याशिवाय, ठाणे, खानदेश, नाशिक या जिल्ह्यांत आदिवासी मंडळ, भिल्लसुधारणा मंडळ, भिल्लसुधारसमिती, डांग सेवामंडळ अशी मंडळे हेच कार्य करीत आहेत. विश्वहिंदुपरिषदेनेही जागोजागी केंद्रे निर्माण करून आदिवासींचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न चालविला आहे. यातून त्यांच्यामध्ये हिंदुधर्माचा आणि भारताचा अभिमान निर्माण झाला आणि भौतिक विद्या त्यांना सुलभ झाली तर त्या समाजातून मोठमोठे कार्यकर्ते व नेते निर्माण होतील आणि मग त्या कार्याला खरी गती येईल. पण यासाठी या कार्याला वाहून घेणारे शेकडो तरुण पुढे आले पाहिजेत. मिशनरी हे धर्मांतर घडवितात याची आपल्याला चीड येते. ते स्वाभाविक आहे. पण घरदार स्वदेश सोडून, सर्व आयुष्य परक्या जमातीत राहून त्यांची अखंड सेवा करीत राहणे हा जो त्याग आहे तसा त्याग करणारे सहस्रावधी तरुण हिंदुसमाजात निर्माण झाल्यावाचून वर्ण, जाती, अस्पृश्यता आणि वन्यत्व यांनी शतधा भंगलेला हा समाज एकरूप होणे अशक्य आहे, आणि तसा तो एकरूप झाल्यावाचून त्याला सामर्थ्य प्राप्त होणे त्याहून अशक्य आहे.
 वर्णभेद, जातिभेद, अस्पृश्यता इ. हिंदुसमाजातील भेदांचा विचार येथवर केला. आता कुटुंबसंस्था हा जो समाजाचा प्रमुख घटक त्याचा विचार करून हे प्रकरण संपवू.

कुटुंबसंस्था
 मानवाच्या सर्व उत्कर्षाचा पाया कुटुंब हा आहे. याविषयी आता जगात दुमत नाही. पण ही संस्था आज सर्वत्र ढासळत चालली आहे. त्यामुळेच सर्व जगातले समाजशास्त्रज्ञ तिचा अभ्यास करीत आहेत, तसा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी एकमुखाने निर्णय दिला आहे की या संस्थेवाचून समाज जगणेच शक्य नाही. त्याग, सेवावृत्ती, प्रेम, भक्ती, उदारदृष्टी, विवेक, संयम इ. अनेक सद्गुणांचे शिक्षण व संवर्धन या संस्थेत होत असते. व्यक्ती ही समाजाची मूल घटक आहे. तिचे हित, तिचा विकास हेच समाजाचे अंतिम उद्दिष्ट आहे; पण या व्यक्तीचा विकास कुटुंबसंस्थेवाचून अशक्य असल्यामुळे कुटुंबसंस्था हाच पाया मानून, सर्व बळ एकवटून, समाजाने तिची जपणूक केली पाहिजे.

 ४४