पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६८८
 

मतदारसंघाला प्राणपणे विरोध केला. यामुळे डॉ. आंबेडकर व एकंदर अस्पृश्य समाज महात्माजींवर चिडून गेला आणि स्वातंत्र्याच्या चळवळीपासून दूर राहिला. प्रारंभी डॉ. आंबेडकर ब्रिटिशांच्या विरुद्ध होते; पण पुढे स्वातंत्र्य आले तर सवर्ण हिंदुसमाज अस्पृश्यांचा छळ करील, असे ते म्हणू लागले. वास्तविक याही वेळी मानवाची अपूर्णता जाणून, महात्माजींची व पं. नेहरूंसारख्या इतर नेत्यांची उदार दृष्टी ध्यानी घेऊन, अस्पृश्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात उतरावयास हवे होते. त्यांनी स्वतंत्रपणे ब्रिटिशांशी लढा केला असता तरी चालले असते. पण इंग्रज हा आपला उद्धारकर्ता आहे ही दुबळी व परावलंबी भूमिका त्यांनी स्वीकारली. त्यामुळे त्यांचे व देशाचे फार नुकसान झाले.

भविष्य
 आज स्वातंत्र्यानंतर पंचवीस तीस वर्षांनी पाहता, अस्पृश्यांच्या स्थितीत पुष्कळ पालट झाला आहे, हे जरी खरे असले तरी, वर्णजातिभेदावरची, जन्मनिष्ठ श्रेष्ठ- कनिष्ठतेवरची हिंदुसमाजाची श्रद्धा गेली आहे, असे दिसत नाही. एका पाणवठ्यावर पाणी भरणे ही साधी गोष्ट करण्यास अजून हा समाज तयार नाही. राजकारणात सर्वत्र जातीयतेचाच आश्रय केला जातो. तेव्हा नजीकच्या भविष्य काळात जातिभेदाचा वा अस्पृश्यतेचा प्रश्न पूर्णपणे सुटेल अशी आशा करण्यास फारशी जागा नाही. अस्पृश्यांना आता शिक्षणाची संधी मिळत आहे आणि सर्व क्षेत्रांत उत्कर्षाला अवसर मिळत आहे. त्यामुळे त्यांच्यातून थोर शास्त्रज्ञ, नेते, राजकारणी, संशोधक, साहित्यिक, मोठे ग्रंथकार, स्थापत्यविशारद, प्रशासक असे थोर पुरुष निर्माण झाले तरच हा प्रश्न सुटू शकेल. पण तशीही फारशी आशा दिसत नाही. तेव्हा विषम समाजरचना नष्ट होऊन हिंदुसमाज एकरूप केव्हा होईल हे सांगणे फार कठीण आहे.

आदिवासी
 अस्पृश्यांप्रमाणेच आदिवासींचा प्रश्न अत्यंत निकडीचा व जिव्हाळ्याचा आहे. वंजारी, भिल्ल, कातकरी, ठाकर, रामोशी, गोंड, वारली, बेलदार, भामटा, मंगेला इ. अनेक जमाती या वर्गात येतात. त्यांची लोकसंख्या अस्पृश्यांइतकीच आहे. यावरून ही समस्या केवढी बिकट आहे ते ध्यानात येईल.

प्राचीन काळी
 हिंदुसमाजात वर्णभेद व जातिभेद दीर्घकाळ आहेत. प्राचीन काळी सुद्धा होते. पण त्यांना असा कडकपणा आलेला नव्हता. शिकंदराच्या काळापासून हर्षवर्धनाच्या अखेरपर्यंत, शक, यवन, युएची, हूण इ. जमातींनी भारतावर नऊ वेळा आक्रमणे केली. भारतीयांनी ती सर्व मोडून काढली, इतकेच नव्हे, तर या सर्व जमातींना हिंदु-