पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६९०
 


ढासळली
 पण आज या संस्थेला विघातक अशा अनेक शक्ती निर्माण झाल्या आहेत. मुंबई, सोलापूर अशी अनेक गिरणगावे निर्माण झाल्यामुळे कोकण, मावळ, खानदेश येथल्या शेतकऱ्यांचे कौटुंबिक जीवन संपुष्टात आले आहे. बायकामुळे गावी ठेवून त्याला एकट्याला मुंबईस राहावे लागते, कुटुंबाचे दर्शन त्याला सटी सहामासीच घडते. हळूहळू समाजाचे दारिद्र्य वाढत आहे. त्यामुळे मध्यम वर्गीय कुटुंब असेच मोडकळीस आले आहे. एकट्या पुरुषाच्या कमाईत कुटुंबाचा खर्च भागत नाही. त्यामुळे स्त्रीलाही द्रव्यार्जन करण्यासाठी दिवसभर बाहेर राहावे लागते. त्यामुळे अपत्य संगोपन ही कल्पनाच हळूहळू नाहीशी होत चालली आहे. दिवसभर आईबाप बाहेर राहत असल्यामुळे मुलांना कोठे तरी राखोळी घालावे लागते. त्यांना 'आई' अत्यंत दुर्मिळ झाली आहे. मग कशाचे संगोपन आणि कशाचे संस्कार ! मध्यम वर्ग हा राष्ट्राचा कणा आहे. नवे तत्त्वज्ञान निर्माण करणे, नवे ग्रंथ रचणे, समाजाला नवी दिशा देणे हे या विद्यासंपन्न वर्गाचे कार्य आहे. पण समाजातून कुटुंबसंस्थेच्या अभावी हा वर्गच नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्याची ती दशा झाली, मध्यम वर्गाची ही दशा झाली. मग तरुण पिढीवर संस्कार व्हावयाचे तरी कोठे?

स्त्रीचे व्यक्तित्व
 याशिवाय स्त्रीशिक्षणामुळे स्त्रीच्या व्यक्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊन, त्या बाजूनेही कुटुंबसंस्थेवर आघात होऊन, तिला तडे जाऊ लागले आहेत. इतके दिवस घरात पुरुष हाच एकमेव कर्ता व सत्ताधारी होता. पण शिक्षणामुळे, द्रव्यार्जनशक्तीमुळे स्त्रीला आपल्यालाही समप्रतिष्ठा प्राप्त व्हावी अशी आकांक्षा निर्माण झाली आहे आणि ती योग्यही आहे. पण त्यामुळे एक शास्ता व बाकी सर्व शासित अशी जी व्यवस्था होती, आणि जिच्यामुळे कुटुंबसंस्था टिकून होती, ती भंगली आहे आणि कुटुंबात अराजक माजण्याची वेळ आली आहे. एक शास्ता व बाकी सर्व त्याचे अंकित ही पद्धत व्यवस्थेच्या, शांततेच्या दृष्टीने योग्य असली तरी तीमुळे शासितांच्या व्यक्तित्वाचा नाश होतो. म्हणूनच लोकसत्तेचा विचार उद्भवला. सर्वाच्या व्यक्तित्वाला अवसर देऊनही शिस्त व स्थैर्य पूर्वीप्रमाणेच टिकवून धरणे ही लोकशाहीपुढची बिकट समस्या आहे. आणि सर्व पक्ष विवेकी असूनही लोकशाही शासन टिकत नाही. हा विवेक, हा समंजसपणा फार दुर्मिळ आहे. त्यामुळेच जगात गेल्या पन्नास वर्षात नव्याने स्थापन झालेल्या लोकसत्ता भराभर कोसळून पडत आहेत. आणि आता तर जुन्या व स्थिर झालेल्या इंग्लंड, अमेरिकेतील लोकसत्ता तरी टिकतील की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. कुटुंबसंस्थेचे तेच होत आहे. स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही व्यक्तित्वाला अवसर द्यावयाचा, पुरुष शास्ता व स्त्री शासित ही पद्धत टाकून देऊन दोघांनाही