पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८७
समाज परिवर्तन
 

सासवड येथे एक मोठी सभा भरविली व अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात असा अर्ज सरकारकडे केला. स्वजातीच्या उत्कर्षासाठी अशा रीतीने जमून चर्चा व विचारविनिमय करण्याचा पायंडा कांबळे यांनी पाडला, म्हणून या सभेचे विशेष महत्त्व आहे.

कलंक
 यानंतर महात्माजींच्या कार्यास प्रारंभ झाला. अस्पृश्यता हा हिंदुधर्मावरील कलंक आहे एवढेच सांगून ते थांबले नाहीत; तर राजकीय चळवळीचे अस्पृश्यता निवारण हे एक अविभाज्य अंग आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या कार्याला फार मोठी चालना मिळाली. स्वातंत्र्याचा संदेश घेऊन खेडोपाडी फिरणाऱ्या हजारो तरुणांनी अस्पृश्यांत मोठी जागृती निर्माण केली. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीला त्यायोगे फार मोठे साह्य झाले.

डॉ. आंबेडकर- शिकवण
 याच सुमाराला डॉ. आंबेडकरांचा उदय झाला आणि ते स्वतः अस्पृष्ट वर्गातील असल्यामुळे त्या वर्गाच्या अस्मितेला फार मोठा उजळा मिळाला. आपल्यातलाच एक माणूस पाश्चात्य देशात जाऊन मोठया पदव्या मिळवून अत्यंत उच्च स्थान प्राप्त करून घेऊ शकतो, या भावनेमुळे अस्पृश्यांना आत्मविश्वास आला आणि त्यांच्या कर्तृत्वाला चालना मिळाली. महाडचा व नाशिकचा असे जे दोन सत्याग्रह डॉ. आंबेडकरांनी घडवून आणले त्यांचे महत्त्व अगदी अनमोल असे आहे. उच्च ध्येयासाठी मनुष्य जेव्हा आत्मार्पण करण्यास सिद्ध होतो, तेव्हाच त्याच्या बुद्धीचा, प्रज्ञेचा खरा विकास होतो. डॉ. आंबेडकरांनी ही शिकवण या सत्याग्रहांच्या द्वारे दिली, म्हणून अस्पृश्यसमाज व एकंदर हिंदुसमाज त्यांचा कायमचा ऋणी राहील.

परागती
 या सत्याग्रहाप्रमाणेच १९३० सालच्या सत्याग्रहात आणि १९४२ च्या चळवळीत अस्पृश्यांनी भाग घेतला असता तर त्यांच्या कर्तबगारीचा याच्या दसपटीने विकास झाला असता. पण तसे घडले नाही. याला कारणे दोन. महात्माजींचा जन्मनिष्ठ वर्णभेद व जातिभेद यावर विश्वास होता. जातिपोटजातीसुद्धा आत्म्याच्या विकासाला अवश्य आहेत असे ते म्हणत असत (यंग इंडिया, ६-१०-२७). ही फार मोठी विसंगती होती. वर्ध्याच्या आश्रमात ते स्पृश्य व अस्पृश्य यांचे विवाह घडवीत असत. स्वतःच्या घरात त्यांनी जातींचा विचार न करता सोयरीक केली. ते स्वतः वैश्य असून त्यांनी राजकारण हा क्षत्रियांचा उद्योग केला. असे असूनही जातिभेदावर आपला विश्वास आहे, असे ते म्हणत असत. शिवाय पुढे त्यांनी अस्पृश्यांच्या विभक्त