पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६८६
 


विधायक कार्य-दिशा
 ब्राह्मणांचे समाजमनावरील वर्चस्व नष्ट करणे हे ब्राह्मणेत्तर चळवळीचे उद्दिष्ट खरोखर फार चांगले होते. पण त्या दृष्टीने फार मोठे विधायक कार्य त्यांनी करावयास हवे होते. बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा, प्रयत्नवाद, यांची शिकवण ग्रामीण समाजाला देणे अवश्य होते. ब्राह्मणेतरांनी लोकजागृतीसाठी जे तमाशे सुरू केले होते त्यांतून ही शिकवण त्यांना देता आली असती. त्याचप्रमाणे कुळकर्णी, वकील असा एक वर्ग निर्माण करावयास हवा होता. या तमाशांच्या द्वारा, धर्माला आलेले कर्मकांडाचे रूप नष्ट करून खऱ्या भगवद्भक्तीचा, समतेचा, लोकसेवेचा धर्म प्रसृत करणे हे कार्य व्हावयास हवे होते. तसे झाले असते तर ग्रामीण भागात फार मोठी मानसिक क्रांती होऊन ब्राह्मणेत्तर समाज स्वातंत्र्याभिमुख झाला असता. त्याच्या ठायी राष्ट्रीय भावना निर्माण झाली असती. पण हे कार्य त्या तमाशांनी केले नाही. ब्राह्मणद्वेष एवढेच उद्दिष्ट त्यांनी डोळ्यांपुढे ठेवले होते. त्यामुळे पुढे पुढे त्यांना अत्यंत ओंगळ रूप प्राप्त झाले.
 वर्णभेद, जातिभेद, त्यातून निर्माण झालेली जन्मनिष्ठ श्रेष्ठ-कनिष्ठता या सर्वांच्या मागे हजारो वर्षांच्या रूढी, अज्ञान, भौतिकविद्येचा अभाव, धर्माला आलेले विकृत रूप, निवृत्ती, दैववाद, परलोकनिष्ठा, ऐहिक उत्कर्षाविषयी उदासीनता हे सर्व रोग आहेत. आणि त्यांचे समूळ उच्चाटन केल्याखेरीज जातिभेद, जातीय अहंकार नष्ट होणार नाहीत. जे वर्णभेद, जातिभेद यांच्याबद्दल आहे ते अस्पृश्यतेबद्दल शतपटीने खरे आहे.
 अस्पृश्य आणि आदिवासी मिळून भारताचा जवळजवळ एकचतुर्थांश समाज होतो. एवढी प्रचंड लोकसंख्या जोपर्यंत माणुसकीच्या पातळीवर येत नाही, त्यातील प्रत्येक व्यक्तीला व्यक्तित्वाची, मानवत्वाची प्रतिष्ठा लाभत नाही, तोपर्यंत भारताच्या लोकशाहीला खरा अर्थ येणार नाही.

कांबळे
 तो अर्थ प्राप्त होण्याच्या दृष्टीने, अस्पृश्यासाठी शाळा काढून म. फुले यांनी पहिला प्रयत्न केला, हे मागे सांगितलेच आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य असेच महत्त्वाचे आहे. १९०६ साली 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' ही संस्था त्यांनी स्थापन केली आणि पुढील पंचवीस वर्षात सर्व हिंदुस्थानभर तिच्या शाखा प्रसृत केल्या. कोल्हापूरचे शाहू छत्रपती, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, म्हैसूरचे महाराज यांनीही अस्पृश्यांसाठी शाळा, वसतिगृहे स्थापणे, त्यांना अधिकाराच्या जागा देणे, अशा तऱ्हेचे बहुमोल कार्य केले. साधारण १९०० सालापासून अस्पृश्य वर्गात जागृती होऊन त्या वर्गातून त्यांचे स्वतःचे नेते व कार्यकर्ते निर्माण होऊ लागले. त्यांपैकी शिवराव जानवा कांबळे यांचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. १९०३ साली त्यांनी