पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८५
समाज परिवर्तन
 

वेळी हे व्हावयास हवे होते. कष्टकरी जनतेची उन्नती हेच टिळकांच्या चळवळीने सूत्र होते. अन्यायाचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य हेच सर्व मानवी गुणांच्या विकासाचे तत्त्व आहे, हे त्यांनी जाणले होते. म्हणून शेतकरी व कामकरी यांच्या जागृतीसाठीच त्यांनी आयुष्य वाहिले होते.

राष्ट्रीय पक्ष - विरोध
 पण राष्ट्रीय चळवळीत समाजसुधारणेला विरोध हे व्यंग पहिल्यापासूनच होते. त्यातल्या कोणत्याही नेत्याला वर्णविषमता, जातीयता मुळीच मान्य नव्हती. पण रानडेप्रभृती जे जे समाजसुधारक त्यांची काँग्रेसमधला राष्ट्रीय पक्ष नेहमी चेष्टा करीत असे. त्यांच्या आचरणातील विसंगतीमुळे ही टीका होती हे खरे. पण तेवढाच दोष दाखवून राष्ट्रीय पक्षाने समाजसुधारणेचा जोराने पुरस्कार करावयास हवा होता. तो न केल्यामुळे सामाजिक समतेच्या व एकंदर समाजसुधारणेच्या चळवळीची फार मोठी हानी झाली हे खरेच आहे. टिळकांनी वेदोक्त चळवळीच्या वेळी आणि पटेल बिलाच्या वेळी सनातन्यांची बाजू घेतली. तसे करण्याचे खरोखर काही कारण नव्हते. पण मानवी अपूर्णता ध्यानी घेऊन आपण कोणत्याही नेत्याचे मूळ कार्य लक्षात घेतले पाहिजे. टिळकांचे मुख्य कार्य वर सांगितल्याप्रमाणे अन्यायाचा प्रतिकार करण्याचे सर्व समाजाचे सामर्थ्य जागृत करणे हे होय. हे जाणून सर्व ब्राह्मणेतर समाज त्याच वेळी खडा झाला असता तर फार मोठी प्रगती झाली असती. पण दुर्दैव असे की आजही स्वातंत्र्यप्राप्ती नंतर ती झालेली नाही. 'एक गाव एक पाणवठा' या डॉ. बाबा आढाव यांच्या चळळीचे जे वृत्तांत पाहावयास मिळतात, त्यावरून असे दिसते की वर्णविषमतेची भावना हिंदुसमाजात अजून जशीच्या तशी कायम आहे.

ब्राह्मणांच्या जागी मराठे
 ती जशी ब्राह्मणांत आहे, तशीच मराठ्यांतही आहे. ब्राह्मणांजवळ आता पूर्वीची विद्या नाही, तप नाही, वेदाध्ययन नाही; तरी आम्ही सर्व वर्णाचे गुरू ही भावना खेड्यापाड्यांतून अजून जिवंत आहे. 'जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तीन्ही लोकीं श्रेष्ठ', ही तुकारामांच्या वेळची वृत्ती अजून अनेक ब्राम्हणांत कायम आहे. जे ब्राह्मणांचे तेच मराठ्यांचे. त्यांच्यांतही जुन्या क्षत्रियांचे पराक्रम राहिलेले नाहीत. तरी आपला वर्ण सर्वात श्रेष्ठ ही भावना आहे. त्यामुळेच मराठामराठेतर चळवळ सुरू झाली. सत्तास्थानी सर्वत्र शहाण्णव कुळीचे मराठे असले पाहिजेत, अशी धडपड मराठ्यांची आहे. ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप या अस्पृश्य पुढाऱ्यांनी हेच लिहिले आहे. 'मराठ्यांनी ब्राम्हणांना हाकलून देऊन त्यांच्या जागा आपण घेतल्या आहेत. अस्पृश्यांनी आपली मुले शाळेत पाठवू नयेत म्हणून, घरादारांचा नाश करू, अशा धमक्या त्यांनी दिल्या.'