पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८३
समाज परिवर्तन
 

निर्माण झाले. महाराष्ट्रात हेच व्हावयास पाहिजे होते. याला ब्राह्मण केव्हाही बंदी घालू शकले नसते. विलायतेला आपली मुले धाडू शकतील अशी शंभर संपन्न घराणी शहाण्णव कुळीच्या मराठ्यांत सहज होती. पण त्यांनी हे मनातही आणले नाही आणि ब्राह्मणांनी आम्हांला विद्याविन्मुख केले असे मराठा समाजाचे प्रा. लठ्ठे, श्री. काशीराव देशमुख इ. ग्रंथकार म्हणतच राहिले. हा ब्राम्हणांचा नसता बडेजाव आहे. त्यांच्या हाती काडीचीही सत्ता नसताना, ती आहेच, असे ब्राह्मणेतरांनी प्रतिपादिले. आणि उत्कर्षाचा जो राजमार्ग सर्वांना खुला होता तो म्हणजे भौतिक विद्येचा मार्ग त्यांनी अनुसरला नाही.

कायमची अढी
 ब्राम्हणेतर समाजाने विद्याधनाची उपेक्षा केल्यामुळे ब्राह्मण व ब्राह्मणेतर समाजात फार मोठी विषमतेची दरी निर्माण झाली. डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक या समाजातल्या प्रतिष्ठेच्या जागा आणि कुळकर्णी, कारकून, मामलेदार, पोलीस अधिकारी, न्यायाधीश या व इतर सरकारी प्रतिष्ठेच्या सर्व जागा ब्राह्मण, प्रभू, इ. विद्यासंपन्न लोकांनी व्यापल्या. यामुळे ब्राह्मणेतर समाज अत्यंत असंतुष्ट होऊन गेला आणि ब्राह्मण हा आपला शत्रू आहे, वैरी आहे, अशी कायमची अढी त्याच्या मनात बसली.

इंग्रज मित्र
 यामुळे एक घातक परिणाम झाला. ब्राह्मण हेच फक्त आर्य आहेत व इतर सर्व समाज शूद्र आहे असे जोतिबांनी सांगितले होते. इंग्रज हे सुद्धा त्यांच्या मते शूद्र होते. तेव्हा ब्राम्हण या आपल्या शत्रूपासून आपले रक्षण व्हावयाचे असेल, तर इंग्रजांचे राज्यच येथे कायम राहिले पाहिजे, असा सिद्धान्त त्यांनी मांडला. आणि ब्राहाणेतर चळवळीतल्या लोकांनी तो मनोभावे उचलला. जोतिबांनी सांगितलेली विद्येची महती आणि सर्व ब्राह्मणेतर समाज शूद्र म्हणजे एकाच रक्ताचा, म्हणजेच समपातळी- वरचा आहे हा त्यांचा सिद्धान्त कोणीही मानला नाही. ब्राह्मण हा आपला वैरी व इंग्रज हा आपला मित्र व रक्षणकर्ता आहे, हा विचार मात्र त्यांनी स्वीकारला आणि जवळजवळ पन्नास वर्षे ते स्वातंत्र्याच्या चळवळीपासून अलिप्त राहिले. महाराष्ट्राची त्यामुळे फार मोठी हानी झाली.
 विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक यांच्यापासून महाराष्ट्रात आणि भारतात स्वातंत्र्याच्या चळवळीचे एक नवे युग सुरू झाले. या चळवळीत त्याच वेळी ब्राह्मणेतर समाज सामील झाला असता तर त्याच वेळी त्याचा उत्कर्ष होऊन त्या समाजातून मोठे मोठे कर्ते पुरुष निर्माण झाले असते. स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि भौतिकविद्या यांचा गुणच असा आहे. आणि ब्राह्मणेतर समाज रक्तातल्या गुणांच्या दृष्टीने पाहता ब्राह्मणांच्या पेक्षा रतीभरही कमी नाही. पण ते गुण विकसित होण्यासाठी