पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६७९
समाज परिवर्तन
 


सुधारणेचे तत्त्वज्ञान
 जोतिबांचे कार्य चालू असतानाच न्या. मू. रानडे यांचा उदय झाला आणि लोकोत्तर बुद्धिमत्तेने व पांडित्याने त्यांनी समाजसुधारणेचे सर्व तत्त्वज्ञान सांगून महाराष्ट्रात समाजसुधारणेचा पाया भक्कम करून टाकला.

अविभाज्य
 सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक या सर्व सुधारणा अविभाज्य आहेत, हा त्यांचा पहिला सिद्धांत होता. या चारही क्षेत्रांतील सुधारणांमुळे ज्यावर परिणाम व्हावयाचा ते मानवी मन एकच असल्यामुळे या सर्व सुधारणांचा सामग्ऱ्यानेच विचार व्हावयास हवा. हा विचार लेख, व्याख्याने, प्रवचने याद्वारा रानडे यांनी समाजमनावर बिंबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

मानवी प्रतिष्ठा
 'मानवी प्रतिष्ठेचे उज्जीवन' हा त्यांचा दुसरा सिद्धांत होता. आजपर्यंत भारतात मानवी मनावर अनंत बंधने घातली गेल्यामुळे ते कायमचे दुबळे व पंगू होऊन गेले आहे. स्वतंत्र विचार करण्याची कुवतच त्याच्या ठायी राहिलेली नाही. त्यामुळे येथल्या मानवाचे मन सदैव बालच राहून आत्मनियंत्रणाचे सामर्थ्य त्याला कधी प्राप्तच झाले नाही. स्वयंशासनाने येणारी प्रौढता, प्रतिष्ठा, येथल्या समाजाला व मानवाला कधी प्राप्तच झाली नाही. तेव्हा या मानवी शक्तीचे, मानवाच्या बुद्धीचे, प्रज्ञेचे, व्यक्तित्वाचे उज्जीवन केल्यावाचून कोणतीही सुधारणा होणे शक्य नाही, हे माधवरावांनी परोपरीने सांगितले आहे.
 स्त्रीशिक्षण, प्रौढविवाह, पुनर्विवाह, समता, इ. बहुतेक सर्व सुधारणांचा रानडे यांनी पुरस्कार केला आहे आणि स्त्रियांच्या उन्नतीसाठी निर्माण झालेल्या प्रत्येक संस्थेत व चळवळीत त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांचा पिंड क्रांतिकारकाचा नव्हता. ते विकासवादी होते. भारताच्या प्राचीन परंपरेचा त्यांना अतिशय अभिमान होता आणि कोणतीही सामाजिक सुधारणा करावयाची असली तरी आपल्याला आपल्या प्राचीन ऋषींचा आधार निःसंशय मिळेल, आजच्या सुधारणा म्हणजे त्यांनी प्रतिपादिलेल्या तत्त्वांची परिणतीच होय, असे ते म्हणत असत. पण असे असले तरी अंधश्रद्धेचा लवलेशही त्यांच्या ठायी नव्हता. पूर्वजांचा आधार मिळत नसेल तर नवा मार्ग आखू नये, असे त्यांनी कधीच म्हटले नाही. पण नवा मार्ग आखताना विध्वंस, उच्छेद, प्रलय, असल्या आततायी प्रकारांचा आश्रय करणे त्यांस मान्य नव्हते.