पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६७५
समाज परिवर्तन
 

कालिकांचे कर्तव्य आहे हे 'दर्पण'च्या पहिल्या अंकातच त्यांनी सांगून टाकले आहे आणि त्या दृष्टीने राम मोहन राय यांचा गौरव करताना, 'जशी त्यास विद्येची आवड, तशीच धर्मविचाराची होती. तो विचार करून शेवटी त्याने आपला मूळचा वर्णाश्रमादी धर्म, ब्राह्मण धर्म सोडला आणि वेदान्तमत स्वीकारले.' वरील एक दोन वाक्यांवरूनच पाश्चात्य विद्येमुळे येथल्या पंडितांच्या मनात केवढी क्रांती झाली होती ते ध्यानात येईल. लोकरीती, धर्मरीती यांत फेरफार घडविणे हे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन करणे आणि वर्णाश्रमादी ब्राह्मणधर्म सोडल्याबद्दल गौरव करणे, हे गेल्या हजार वर्षाच्या काळात कोणी केले नव्हते. हे बौद्धिक सामर्थ्य त्या काळात कोणाच्याही ठायी नव्हते. भौतिक विद्येच्या अध्ययनाने या अर्वाचीन पंडितांना ते प्राप्त झाले होते.

नवे तत्त्वज्ञान
 तसे सामर्थ्य प्राप्त झाल्यामुळे बाळशास्त्री यांच्यानंतर येथे सुधारकांची एक परंपराच निर्माण झाली. आणि समाजरचनेविषयी श्रुतिस्मृतींनी सांगितलेले नियम अगदी घातक असून पाश्चात्यांनी प्रतिपादिलेल्या समता, व्यक्तिस्वातंत्र्य इ. तत्त्वांचा अंगीकार करून आपण आपल्या समाजाची त्या तत्त्वांवर पुनर्घटना केली पाहिजे, असे निर्भयपणे सांगण्यास त्यांनी सुरुवात केली. व्यक्तीला विचार-उच्चार-आचारराचे पूर्ण स्वातंत्र्य असावे, वर्णभेद, जातिभेद ही व्यवस्था हानिकारक असून व्यक्तीची योग्यता तिच्या जन्मावरून न ठरविता तिच्या गुणांवरून ठरवावी, स्त्रीपुरुषांत पूर्ण समता असली पाहिजे, बालविवाह, पुनर्विवाहबंदी या रूढी नष्ट झाल्या पाहिजेत, पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही शिक्षण दिले पाहिजे, व्यक्तीला आपल्या इच्छेप्रमाणे कोणताही व्यवसाय करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे, हे व या तऱ्हेचे विचार हाच बहुतेकांच्या प्रतिपादनाचा सारार्थ होता. दादोबा पांडुरंग, लोकहितवादी, जोतिबा फुले, विष्णुबुवा ब्रम्हचारी, न्या. मू. रानडे, डॉ. भांडारकर हे या प्रारंभीच्या काळातले प्रमुख पंडित आणि समाजसुधारक होत.

जुनी दृष्टी
 भौतिक विद्येचा अभ्यास येथे झाला नसता तर, आपला अधःपात झाला, पारतंत्र्य आले, दारिद्र्य आले हे कलियुगामुळे आले, पापाचरणाची ही फळे आहेत, पृथ्वीला हा सर्व भार झाला आहे, अशी कार्यकारणमीमांसा करून लघुरुद्र, महारुद्र, ब्राम्हण- भोजने, शतकोटी नामजप, गीता-ज्ञानेश्वरीची अखंड पारायणे, भागवताचे सप्ताह ही उपाययोजना येथल्या शास्त्रीपंडितांनी सांगितली असती !
 वरील सर्व समाजसुधारकांचा निर्देश मागल्या प्रकरणात धर्मपरिवर्तनाचा इतिहास सांगताना केलेलाच आहे. त्या क्षेत्रातले जे नेते तेच याही क्षेत्रात नेतृत्व करीत होते. आणि समाजाची ही दोन्ही अंगे अविभाज्य असल्यामुळे तसे होणे अपरिहार्यच होते.