पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३६.
समाज परिवर्तन
 



नवयुग- लक्षण
 समाजरचनेच्या दृष्टीने येथे ब्रिटिश कालात जे नवयुग निर्माण झाले त्याचे पहिले लक्षण हे की आपले पंडित या समाजातल्या घडामोडींची, उत्कर्षापकर्षाची, यशापयशाची भौतिक दृष्टीने कारणमीमांसा करू लागले. आणि वर्णभेद, जातिभेद, अस्पृश्यता, स्त्रीचे दास्य, व्यक्तीवरची अर्थशून्य बंधने, ही सर्व कारणे आपल्या अधःपाताच्या बुडाशी आहेत हे त्यांच्या ध्यानात येऊन तसे ते उघडपणे सांगू लागले. वरील प्रकारचे समाजाच्या भिन्न घटकांतले जे भेद, त्यांनी पराकाष्ठेची विषमता हिंदुसमाजात निर्माण होऊन तो समाज विघटित झालेला आहे, एकजिनसीपणा, एकसंधपणा असा त्याच्यात राहिलेलाच नाही, हा सर्व एक समाज आहे असे म्हणण्याजोगे कोणतेच लक्षण त्याच्या ठायी दिसत नाही, तेव्हा समाजसुधारणा करावयाची तर प्रथम हे भेद नष्ट करून सर्व जातिवर्णाना, स्त्री, शूद्र, अस्पृश्य यांना समपातळीवर आणले पाहिजे, हे त्यांनी जाणले व त्या उद्योगास ते लागले.

बाळशास्त्री
 या क्षेत्रातही बाळशास्त्री जांभेकर यांचेच नाव पुढे येते. ' 'महाराष्ट्राचे आद्य ऋषी' म्हणून त्यांचा गौरव केला जातो तो अगदी सार्थ आहे. 'लोकस्थिती, धर्मरीती, आणि राज्यरीती यांत चांगले व उपयोगी फेरफार घडवून आणणे' हे नियत-