पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६७१
धर्मक्रांती
 

करू शकत नाही. विश्वाच्या नियंत्यावर व त्याच्या नियमबद्धतेवर श्रद्धा, हा धर्माचा अंतिम अर्थ आहे. त्यामुळे हिंदुस्थानात अनेक धर्म असले तरी त्याची चिंता नाही. हे तत्त्व या सर्व धर्मात आहेच. त्यामुळे त्यांच्यांत भेद न माजता ऐक्यच होईल.'

व्यवहारी धर्म
 महात्माजी नेहमी त्यागाचा उपदेश करीत व भोगविलासांचा निषेध करीत. पण मनुष्याला काही किमान सुखे व काही किमान वासनातृप्ती मिळालीच पाहिजे, असे त्यांचे मत होते. जगण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. तेव्हा त्यासाठी अन्न, वस्त्र, घर ही आवश्यकच आहेत. त्यांचाही त्याग करावा, असे धर्म सांगत नाही. धर्म आणि व्यवहार यांची सांगड सदैव असलीच पाहिजे. जो धर्म नित्याच्या व्यवहाराचा व त्यातील समस्यांचा विचार करीत नाही तो महात्माजींच्या मते धर्मच नव्हे. ते एकदा म्हणाले, 'मी काही आध्यात्मिक किंवा धार्मिक तत्त्व सांगितले आणि ते जर अव्यवहार्य ठरले तर ते माझे अपयश आहे. खरे धर्मतत्त्व हे संपूर्णपणे व्यावहारिक असले पाहिजे.'
 महात्माजी अनेक वेळा अंतःसंदेशावर, आतल्या आवाजावर विसंबून असत. पण याचा अर्थ ते ग्रंथप्रामाण्य मानीत असत किंवा बुद्धिप्राणाण्याला त्यांचा विरोध होता असा नाही. त्यांनी स्वच्छ म्हटले आहे की 'जे बुद्धीला पटत नाही ते धर्मतत्त्व मी त्याज्य मानतो. बुद्धीलाही काही मर्यादा आहेत, हे मला मान्य आहे. त्या प्रत्येकाने ध्यानात घेतल्याच पाहिजेत. पण म्हणून प्रत्येक सिद्धांत आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासून घेतला पाहिजे, हा आग्रह सोडता कामा नये.' (सर्व उतारे, सिलेक्शनस् फ्रॉम गांधी, निर्मलकुमार बोस)
 हे सर्व पाहिल्यावर मोक्ष, ऐहिक उत्कर्ष, व्यवहार, ग्रंथप्रामाण्य, राष्ट्रधर्म, दलितसेवा, राजकारण आणि धर्म यांचे अद्वैत, इ. निनिरराळ्या धर्मतत्त्वांच्या बाबतीत लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांच्यांत भेद होता असे दिसत नाही. संन्यास, अध्यात्म, दीनदलितांची सेवा याविषयी स्वामी विवेकानंदांनीही अशाच तऱ्हेचे विचार मांडलेले आहेत, हे आपण वर पाहिलेच आहे.

धर्मनिर्णय मंडळ
 ब्रिटिश कालात 'धर्मविचारमंथन झाले आणि सनातन हिंदुधर्मात परिवर्तन घडवून आणण्याचे प्रयत्न झाले त्यात लोणावळ्याचे 'धर्मनिर्णय मंडळ' याला महत्त्वाचे स्थान आहे. तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे हे त्याचे प्रवर्तक व कार्यवाह होते. आणि म. म. पां. वा. काणे, श्रीधरशास्त्री पाठक, नारायणशास्त्री मराठे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, वाईचे दिवेकर शास्त्री, नागपूरचे डॉ. के. ल. दप्तरी, सदाशिवशास्त्री भिडे, हे थोर पंडित त्यांच्या पाठीशी होते. जुन्या परंपरांचा, धर्म-