पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६७२
 

ग्रंथांचा, सर्व मान सांभाळून मानवी बुद्धीने धर्मात परिवर्तन घडवून आणणे, हे मंडळाचे उद्दिष्ट होते.(स्थापना १९३८) . विवाहसंस्थेत सुधारणा, अस्पृश्यतानिवारण, जातिसमता, सर्व धर्मी समानत्व, मंदिरप्रवेश इ. सुधारणांविषयी व्याख्याने, परिषदा, पत्रके, पुस्तके या साधनांनी लोकमत तयार करण्याचे बहुमोल कार्य मंडळाने केले आहे. रघुनाथशास्त्री कोकजे यांनी 'धर्मस्वरूप निर्णय' (१९३३) व 'हिंदूंच्या अवनतीची मीमांसा ' (१९४४) हे दोन महत्त्वाचे ग्रंथ लिहून मंडळाच्या कार्याला स्थैर्य आणून दिले. वेदकालापासून आजपर्यंत वैदिक धर्मात कोणकोणती परिवर्तने झाली, कोणती तत्त्वे, कोणतं सिद्धांत, कोणते आचारविचार कोणत्या कालात प्रभावी होते आणि त्यांचे बरेवाईट परिणाम होऊन हिंदूंची उन्नती अवनती केव्हा कशी होत गेली, याचे साधार- सप्रमाण विवेचन या दोन ग्रंथांत कोकजेशास्त्री यांनी केले आहे. प्रस्तुत महाराष्ट्रसंस्कृतीच्या विवेचनात प्रत्येक कालखंडातील धर्मस्वरूपाचा विचार केलेला आहे. तशा स्वरूपाच्या धर्मविचारांचा सर्व इतिहास या वरील ग्रंथांत अखिल भारतासंबंधी आलेला आहे. पुढल्या काळात म. म. डॉ. काणे यांनी 'धर्मशास्त्राचा इतिहास' हा आपला प्रचंड ग्रंथ लिहिला. हिंदूंच्या उत्कर्षापकर्षाच्या इतिहासाच्या दृष्टीने या ग्रंथाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

ब्रह्मचर्याश्रम
 विनायक महाराज मसूरकर यांनी मसूरला स्थापन केलेला 'ब्रह्मचर्याश्रम' याने धर्मजागराचे केलेले कार्य उल्लेखनीय आहे. धर्मांतराची लाट थोपवून पतितांची शुद्धी करणे यावर विनायक महाराजांचा फार भर होता. त्यांच्या शिष्यांनी आज गोरेगावच्या मसुराश्रमात तेच महत्त्वाचे कार्य चालविले आहे.
 शेवटी स्वातंत्र्यवीर सावकार यांनी धर्मक्रांतीच्या क्षेत्रात जे विचार मांडले, जे कार्य केले, त्याचा परामर्श घेऊन हे विवेचन संपवू.

सावरकर
 सावरकर क्रांतिकारक होते, असे सांगताना, त्यांच्या राजकीय क्षेत्रातल्या कार्याचेच विवेचन केले जाते. पण स्वतः सावरकरच सांगत की 'राजकारण, समाजकारण, धर्म ही समाजपुरुषाची अंगे अविभाज्य आहेत. एक दुसऱ्यावाचून नेहमीच पंगू राहणार.' मनाशी हा सिद्धांत निश्चित झालेला असल्यामुळे धर्मक्रांतीची अनेक तत्त्वे त्यांनी आपल्या निबंधांतून विवरिली आहेत. 'दोन शब्दांत दोन संस्कृती' या निबंधात त्यांनी हिंदूंच्या शब्दप्रामाण्यावर, श्रुतिस्मृतिपुराणोक्तावर कडक टीका केली आहे आणि हिंदुराष्ट्राला काळाच्या तडाख्यातून वाचायचे असेल तर श्रुतिस्मृतिपुराणोक्ताची ही बेडी तोडून टाकली पाहिजे आणि हिंदुधर्माला प्रत्यक्षनिष्ठ, प्रयोगक्षम व विज्ञाननिष्ठ असे रूप दिले पाहिजे, असा इशारा दिला आहे.